महादजी शिंदे यांच्या पत्नीची समाधी दुर्लक्षित
प्रा. डॉ. कदम हे तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख आहेत. शिवकालीन सेनापतींचा गनिमी कावा या विषयावर त्यांना नुकतीच पीएच.डी. मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात ८ या आकड्याचा योगायोग यावरही त्यांनी संशोधन केले आहे. अन्नपूर्णाबाई यांच्या नांदूरघाट येथील समाधीची त्यांनी नुकतीच पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
प्रा. डॉ. कदम म्हणाले की, ग्वाल्हेर येथील मराठा सरदार महादजी शिंदे (सिंधिया) हे पेशवे कालखंडातील एक पराक्रमी सरदार होते. साताºयाजवळील कन्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील राणोजी हे मराठ्यांच्या दरबारातील मातब्बर शिपाई होते. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळेच मराठी सत्तेचा उत्तरेकडे विस्तार होण्यास मदत झाली. त्यातूनच ग्वाल्हेर (पूर्वीचे उज्जैन) शिंदे घराण्याचे मुख्य ठाणे म्हणून स्थापन केले. शिंदे घराण्यात अनेक पराक्रमी वीर जन्माला आले. यापैकी दत्ताजी शिंदे यांनी पानिपतच्या मैदानावर दिलेला बचेंगे तो और भी लढेंगे हा नारा आजही लोकप्रिय आहे.
दत्ताजी यांचे सावत्र बंधू महादजी यांनी आपले शौर्य आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर मराठ्यांचे साम्राज्य तोलून धरले. ग्वाल्हेर येथे आपल्या गादीची स्थापना करून महादजी यांनी उत्तरेकडे साम्राज्य वाढविले.
महादजी यांच्या मातोश्री राजपूत समाजातील होत्या. असे असले तरी त्यांनी महाराष्ट्रातील घराण्यात विवाह केले. अपत्ये जगत नसल्याने त्यांनी नऊ विवाह केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी अन्नपूर्णाबाई या बीड येथील निंबाळकर घराण्यातील होत्या. नवव्या पत्नी लक्ष्मीबाई या तुळजापूरच्या भोपे-कदम घराण्यातील होत्या.
महादजी शिंदे पानिपतच्या युद्धात लढत असताना अन्नपूर्णाबाई यांनी ते सुखरूप परत यावेत म्हणून बीडचे सुफी संत मन्सूरशहा यांच्याकडे प्रार्थना केली होती. महादजी यांना एक पाय गमवावा लागला तरी ते सुखरूप परतले. नंतर महादजी यांनी मन्सूरशहा यांचे शिष्यत्व पत्करले.
नंतर ते तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला आले. महादजी यांच्या बहिणीचा विवाह वाशी (जि. उस्मानाबाद) येथील कल्याणराव देशमुख-कवडे यांच्याशी झाला होता. त्यांची भेट घेऊन परत जाताना वाटेत अन्नपूर्णाबाई यांचे १६ एप्रिल १७९२ मध्ये नांदूरघाट येथे निधन झाले. त्यावेळी महादजी यांचा नांदूरघाट येथे १३ दिवस मुक्काम होता. त्यादरम्यान त्यांनी तेथे अन्नपूर्णाबाई यांची समाधी बांधली. या समाधीकडे आता शिंदे घराणे आणि समाजाचेही दुर्लक्ष झाले आहे. समाधीच्या बाजूला गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
समाधीला संरक्षक कठडेही नसल्याचे प्रा. डॉ. कदम यांनी सांगितले. ग्वाल्हेर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये या समाधीविषयी साधा उल्लेखही नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ग्वाल्हेर येथील शिंदे घराण्याशी संपर्क साधून अन्नपूर्णाबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. डॉ. कदम यांनी सांगितले.
महादजी शिंदे यांच्या चार पत्नींच्या निधनाचे ठिकाण आतापर्यंत निश्चित झाले आहे. भागीरथीबाई यांचे नगरला, गंगाबाई यांचे मेवाडच्या स्वारीत, यमुनाबाई यांचे वाराणसीत आणि तुळजापूरच्या लक्ष्मीबाई यांचे राजस्थानमधील दतिया येथे निधन झाले.
यापैकी काही समाधी सुस्थितीत आहेत, असे प्रा. डॉ. कदम यांनी सांगितले.
महादजींचा मृत्यू पुण्याजवळ
महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी येथे १२ फेब्रुवारी १७९४ मध्ये झाला. महादजींनी आपल्या कवायती फौजेवर डी बॉयन नावाचा इंग्रज अधिकारी नेमला होता. राणेखान सेनापती असलेल्या त्यांच्या फौजेत १ लाख ५७ हजार सैनिक होते. पेशवे इंग्रजांवर वचक ठेवत महादजींनी उत्तरेकडे सत्तेचा विस्तार केला आणि मराठ्यांचा महसूल २ कोटी ४२ लाखांवर नेला होता.
प्रा. डॉ. सतीश कदम, इतिहास संशोधक
महादजींच्या नऊ पत्नींची नावे
१) अन्नपूर्णाबाई (बीड येथील निंबाळकर घराणे) २) भवानीबाई (घाटगे घराणे) ३) पार्वतीबाई (नरसिंग घाटगे यांची बहीण) ४) भवानीबाई (संगमनेर येथील देशमुख घराणे) ५) गंगाबाई (पलवेकर घराणे) ६) राधाबाई (पद्मसिंग राऊळ घराणे), ७) भागीरथीबाई (कर्डेकर घराणे) ८) यमुनाबाई (रामलिंग राऊळ घराणे) ९) लक्ष्मीबाई (तुळजापूरचे भोपे-कदम घराणे).
महादजी तुळजापूरचेही जावई
अन्नपूर्णाबाई यांच्या निधनानंतर महादजी शिंदे पुढे तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले. तेथे त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी तुळजापूर येथील आनंदराव भोपे-कदम यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह केला.
1 टिप्पण्या
very good yala mahantat history...
उत्तर द्याहटवाpls tell me what your mind.