SAyali sangita

आपल्या माणसाची किमान माती करता आली

 19-09-2015 09:20:30 PM
A- A A+
इतिहास विषय सांगायला आणि ऐकायला तसा बरा आहे; परंतु पचवायला किती जड आहे हे अनुभवल्याशिवाय कळणे कदापि शक्य नाही. गतकाळात होऊन गेलेल्या घटनांचे आपण अगदी सहजपणे विश्लेषण करून जातो. त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतोच असे नाही. भर दरबारात लखुजी जाधवरावांच्या झालेल्या खांडोळ्या, शहाजीराजांचे आकस्मिक अपघाती निधन, संभाजीराजांच्या देहाचे झालेले तुकडे आठवले तर आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाहीत. या पराक्रमी माणसांचे दुर्दैव एवढे विदारक आहे की, आपल्या माणसाकडून त्यांचा नीट अन्त्यविधीसुद्धा होऊ शकला नाही. त्यामुळे आज लोकशाहीत जगत असताना आपल्या घरातील एखाद्याचे अपघाती निधन झाले तर सन्मानपूर्वक आपण किमान त्यांचा अन्त्यविधी करू शकतो हा इतिहासापासून आपण बोध घ्यावा का? असा गैरसमज करून घेतल्याशिवाय आपण वर्तमानात जगून इतिहास घडवू शकत नाही.
            चारशे वर्षांनंतरही आज छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचताना मोठा रोमहर्षक वाटतो. परंतु शिवरायांच्या भोसले घराण्याने स्वराज्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या याचा आपण कधी बारकाईने विचारच केला नाही. जिजाबाई कुठल्या तरी प्रेरणेने घडल्या यापेक्षा त्यांना परिस्थितीने घडविले हे वास्तव आहे. निजामशाहीची चाकरी करत असताना जिजाबार्इंचे सासरे इंदापूरच्या युद्धामध्ये मारले गेले. चारशे कि.मी.वर वेरूळला राहणा-या त्यांच्या घराण्याला अन्त्यविधीला उपस्थित राहता आले असेल हे संभवत नाही. दुस-या बाजूला जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव यांना निजामाने मोठ्या विश्वासाने देवगिरीच्या किल्ल्यावर बोलावून घेतले. राजाला भेटायला गेलेल्या आपल्या सरदाराची त्यांचे कुटुंब गडाखाली वाट पाहात होते. तेवढ्यात निरोप आला निजामाने भर दरबारात लखुजी जाधवरावांच्या खांडोळ्या केलेल्या आहेत. जीव मुठीत घेऊन सर्वजण सैरावैरा पळायला लागले. निजामाकडे आपली तलवार गाजवताना जिजाबार्इंनी आपले सासरे, वडील आणि दोघा भावांचे झालेले निधन उघड्या डोळ्यांनी पाहिले नाही तर फक्त कानांनी ऐकले होते. कारण एवढ्या धामधुमीत त्यांची उत्तरक्रिया कशी झाली असेल ते देवच जाणो.
     भातवडीच्या युद्धात जिजाबार्इंचे दीर शरीफजी राजे मारले गेले. मी संबंधित ठिकाणाला भेट दिली तर त्या परिसरात दोन-चार मुस्लिम बनावटीची थडगी आहेत; पण राजांच्या समाधीचा व्यवस्थित पत्ता लागत नाही. एक भाऊ निलंगा येथे तर २ भाऊ देवगिरीच्या किल्ल्यात मारले गेले. जिजाबार्इंना आपल्या भाऊरायांचे अंतिम दर्शन घेता आले असेल असे संभवत नाही. त्याचप्रमाणे असेच एकदा त्या गोदावरी नदीकाठी आपली भावजयी खेलोजी भोसल्यांच्या पत्नीसोबत जात असताना महावत खानाने खेलोजीच्या पत्नीला उचलून नेले. हे कृत्य त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. काय वेदना झाल्या असतील याची आज फक्त चर्चा करू शकतो.
          आपण सहजपणे ‘जय भवानी, जय जिजाऊ’ घोषणा देत असतो. परंतु त्यांच्या चरित्राचा अभ्यास किती जण करतात? शिवरायांच्या जन्मापर्यंत जिजाबार्इंचे सासर आणि माहेर असे दोन्हीकडील लोक हे अहमदनगरच्या निजामाकडे चाकरीला होते. बदल्यात काय मिळाले त्यांना? शिवजन्मापूर्वीच जिजाऊंनी सासरे, दीर, वडील, भाऊ कुठल्याना कुठल्या लढाईत हरवले होते. १६३० ला संपूर्ण देशभर महाभयानक दुष्काळ पडला होता. त्यातच शहाजीराजांना निजामशाही सोडून आदिलशहाकडे जावे लागले होते. त्या वेळी गरोदर असणा-या जिजाबार्इंना घोड्यावर बसून मोठी रपेट करावी लागली होती. मोठ्या कष्टमय वातावरणात शिवनेरीवर राजांचा जन्म झाला. तर शहाजीराजांना आदिलशहाने बेंगलोरची जहागिरी दिल्याने हे घराणे काहीसे स्थिरावले गेले. बालशिवबांना घेऊन त्यांनी पुण्याची जहागिरी पुढे हाती घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकारले. ३५० वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले साम्राज्य निर्माण झाले. याचे संकलन जिजाऊंनी केले यात तिळमात्र शंका नाही. या सर्व बाजू मांडत असताना आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा कधी विचारच केला नाही. शिवरायांचे थोरले बंधू संभाजी व इतर अनेक पत्नींसह शहाजीराजे कर्नाटकात राहिले तर नवरा असूनही एखाद्या विधवेप्रमाणे त्यांना पुण्यात एकाकी जीवन व्यतित करावे लागले. शिवरायांचे साम्राज्य फुलत गेले. परंतु जिजाऊंच्या वेदना कधी शमल्या नाहीत. थोरला मुलगा संभाजी आदिलशाहीकडून लढताना कर्नाटकातील कनकगिरी येथे मारला गेला. याची खबर जिजाऊंना किती दिवसांनी लागली हे निश्चितपणे सांगता येणार नाही. अफजलखान चालून आला त्याच वेळी राजगडावर सईबार्इंचे निधन झाले. या वेळी राजांना शोक करत बसायला तेरा दिवसही मिळाले नाहीत.
         पुढे शिवरायांनी मोगलांना शह देण्यासाठी ५ जानेवारी १६६४ ला थेट सुरतेवर स्वारी केली. संपूर्ण हिंदुस्थान या घटनेने हादरून गेला. त्या वेळी इंग्लंडमध्ये ‘लंडन गॅझेटिअर’ नावाच्या वर्तमानपत्राने पहिल्या पानावर ही बातमी छापली. अगणित संपत्ती घेऊन राजे राजगडावर परतले. जिजाबार्इंना किती आनंद व्हायला पाहिजे होता. परंतु नियतीला मान्यच नव्हते. कारण राजे स्वारीवर होते. त्याच वेळी कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होदीगेरे नावाच्या गावात शहाजीराजांचा घोड्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शहाजींची दोन मुले शिवाजी सुरतेत तर व्यंकोजी बेंगलोरात होते. खुद्द जिजाबार्इंना कित्येक दिवसांनंतर ही घटना माहीत झाली. शिवरायांनंतर औरंगजेबाने संभाजीराजांचे तुकडे-तुकडे करून तुळापूर भागात फेकून दिले. त्यांच्या पत्नी येसूबाई रायगडावर होत्या. नव-याचा शोक करणे सोडाच औरंगजेबाने त्यांना अटक करून कैदेत टाकले. आपल्या ७ वर्षांच्या पोराला घेऊन पुढे सलग २० वर्षे त्या मोगलांच्या कैदेत होत्या. त्यामुळे भोसले घराण्याच्या पराक्रमाची महती गाताना त्यांच्या त्यागाची माहिती जाणून घेणे उचित ठरणार आहे. कारण इतिहासातील बलिदानामुळेच वर्तमानातील मोठेपण ठरत असते.
             छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यावर पीएच. डी करत असताना इतिहास संशोधनाचे वेड लागले. रोज १०-१२ तास पुस्तकांचे वाचन केल्यामुळेच अनेक नवीन संशोधन पुढे आले. फक्त पुस्तकांवर विसंबून न राहता थेट संबंधित स्थळाला भेट देऊन लिखाणाची सवय असल्याने प्रवास आलाच. इतिहासामुळे आपणाला पर्यटन होतेय म्हणून सोबत येताना पत्नी मोठी खुश ! त्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणे तर झालीच शिवाय नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये पत्नी आणि मुलीसह जाता आले हे भाग्यच.
            १५ ऑगस्ट २०१५... सलग चार-पाच दिवस सुट्या आल्याने मध्य कर्नाटकाचा दौरा हाती घेतला. संभाजीराजांची कनकगिरीतील समाधी, शहाजीराजांच्या होदेगिरीतील समाधीचे दर्शन, छत्रपती शिवराय कर्नाटक दौ-यात असताना हरिहर, मुरडेश्वरला गेले होते. तेथे आपणही माथा टेकावा असा ऐतिहासिक बेत आखून नको-नको म्हणत असताना प्रवास सुरू केला. विजापूर, बदामी, कुडलसंगम ही ठिकाणे पाहून सारे कुटुंब धन्य झाले. बदामीहून हम्पी १५० कि.मी. अंतरावर असल्याने पुढील प्रवास जरा वेगातच सुरू केला. हम्पी म्हणजे हरिहर आणि बुक्क या दोन बहाद्दर माणसांनी वैभवास आणलेले विजयनगरचे साम्राज्य. सोन्याचा धूर निघणारे हे शहर १५३० पूर्वी सोने, चांदी, जडजवाहीर ते परदेशी घोड्यांसाठी प्रत्येकाला स्वतंत्र बाजारपेठ असणारे शहर होते. पंढरपूरचा पांडुरंग अनेक दिवस याच हम्पीत होता. त्या मंदिराच्या खांबावर मारले तर सारेगमपा चा नाद घुमतो अशी माहिती गाडीत सुरू असतानाच भर दुपारच्या १२.१५ ला आमच्या गाडीचे डावीकडील टायर फुटले. एका मिनिटातच होत्याचे नव्हते झाले. गाडीत पत्नी, मुलगी आणि मी एवढेच. गाडी माझ्या बाजूला पूर्णपणे घासलेली असताना मला सुरक्षित ठेवून त्या दोघींचा देवाने जीव घेतला.
बराच वेळ झाल्यानंतर माझा इतिहास समोर उभा राहिला. एवढ्या दूरदेशी पुढील कारवाई आवश्यक होती. इतिहासाच्या माध्यमातून अनेक थोरामोठ्यांचा संबंध आला. तो इथं कामाला आला. माझे अगदी जवळचे मित्र एसपी व अनेक राजकारण्यांनी सर्व सूत्रे हाती घेऊन पुढील कार्य व्यवस्थित पार पाडले. घटनास्थळापासून संभाजीराजांचे समाधीस्थळ जवळच होते. त्याची आठवण झाली. समाजासाठी प्राण देणा-या शिवरायांच्या पूर्वजांचे मरणोत्तर काय झाले असेल तर याची जाणीव होऊन लोकशाहीमुळे आपणाला आपल्या माणसाची किमान अन्त्यविधी व्यवस्थित करता आला हे इतिहासाची जाण असल्याने अधिक उमजते. फेसबुकवर मी एक वाक्य लिहिले होते. ‘इतिहास सांगण्यासाठी इथं आलो होतो आणि थोड्याच वेळात माझे कुटुंब इतिहासजमा झाले.’ असो. सर्वांच्या सहकार्यातून दोन्ही हात मोडलेले असताना पुन्हा एकदा पेन उचलला. इतिहासाचा वसा असाच पुढे चालवू या... जोपर्यंत स्वत: इतिहासजमा होत नाहीत तोपर्यंत.
डॉ. सतीश कदम
मोबा. ९४२२६ ५००४४     satishkadam28@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या