तुळजाभवानीच्या सेवेतील वाकोजीबुवा मठ
30 Jul 2017 PunyNagari 
तुळजाभवानीची प्रत्यक्ष देवीची सेवा बजावणारे दोनच मठ आहेत. एक मठ वाकोजीबुवांचा आणि दुसरा मठ चिलोजीबुवांचा आहे. त्यातही वाकोजीबुवा मठाची सेवा म्हणजे तुळजाभवानीच्या सर्वच नित्योपचार पुजेची जबाबदारी याच मठाला पार पाडावी लागते. मंदिरालगतच्या मठात ब्रम्हचारी राहून पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत तुळजाभवानीच्या पुजाविधी पार पाडण्याचे काम या मठाचे महंत करतात..
मंदिराच्या पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज दरवाज्यालगत डाव्या हाताला वाकोजीबुवांचा मठ आहे. निजाम राजवटीपासून मंदिराचे प्रशासान हे उस्मानाबादच्या कलेक्टरकडे (निजाम राजवटीतील तालुकदार)असून मंदिरासाठी स्वतंत्र व्यवस्थापक असलातरी परंपरेने तुळजाभवानी मंदिराची चावी ही याच मठाकडे असते. यावरुन मठाचे महत्त्व ध्यानात येते. विशेष म्हणजे देवीची प्रत्यक्ष पूजाअर्चा करण्यासाठी भोपे पुजारी अस्तित्वात आहेत. पुजाऱ्यांचा इतिहास इ. स. १५६० म्हणजे ४५० वर्ष जुना असून त्याप्रमाणे मठाचा प्राचीन इतिहास उपलब्ध होत नाही.तरी परंतु मठाशिवाय प्रत्यक्ष देवी मंदिरातही वाकोजीबुवासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था अस्तित्वात होती शिवाय सध्याचे महंत २१ वे मठाधिपती असल्याने मठाची निर्मिती ४००-५०० वर्षे निश्चित मानायला हरकत नाही. मठाच्या नावावरून महंत वाकोजीबुवा हे याचे संस्थापक असावेत. त्यांचे पुढील शिष्य बजाजीबुवा नंतर तुकोजीबुवा झाल्याने या मठाच्या महंताला वाकोजी, बजाजी आणि तुकोजी याप्रमाणे नाव धारण करावे लागते. सध्या मठाधिपती म्हणून तुकोजीबुवा सेवेत आहेत. ब्रम्हचर्येचे पालन करत मठामध्ये ओसरीला राहून देवीची अखंडपणे सेवा करणे हे महंताचे मुख्य काम आहे. महत्वाचे म्हणजे कुठल्याही संप्रदायाशी संबंधित नसल्याने मठाचा कोणताही शिष्यवर्ग नाही अथवा इतर कुठलाही सोपस्कार नाही. फक्त देवीची सेवा एवढेच कर्तव्य आहे. महंताचे वय झाल्यानंतर अथवा इतर कारणास्तव त्यांच्या इच्छेनुसार सत्यस्थितीतील महंत विधीपूर्वक आपला चेला नेमतात. आकस्मित निधन वा अन्य कारणास्तव वारसदार नेमण्याची वेळ आलीतर मृत महंताच्या मांडीवर ठेवून अथवा महंताच्या समाधीवर ठेवून विधीवतपणे पुढील महंताची नेमणूक होते. निजामकाळापासून मंदिरावर कलेक्टराच्या अधिपत्याखाली प्रशासन व्यवस्था असून महंताच्या निवडीसाठी सुद्धा उपविभागीय अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. त्याला अतियात (उपविभागीय दंडाधिकाऱ्याचे) न्यायालय म्हणतात. तर महंताच्या कायदेशीर परवानगीला विरासत म्हणतात. त्यानुसार सध्याचे तुकोजीबुवा हे ९ एप्रिल २०१३ पासून या मठाचे महंत म्हणून काम पाहतात. .
पूर्वापार परंपरेने महंतांना पुढीलप्रमाणे कामे आहेत. प्रात:काळी सकाळी ४.३० वाजता मंदिराची कुलपे काढून गाभाऱ्यात जावून देवीजींचे चरणतीर्थ करणे. त्यानंतर पुजारी आला की दागिन्यासह देवीस पुजाऱ्याच्या स्वाधीन करणे, पुजाऱ्याने मुख्य पूजा सुरू केल्यानंतर देवीच्या स्नानास पाणी देणे व पुजाऱ्यासोबत देवीला स्नान घालणे, देवीच्या नंदादीपाची व्यवस्था ठेवणे, पूर्वी मंदिर परिसरात दिवे लावले जात होते. त्या दिव्यांना वरचेवर तेल घालणे, रात्री १० नंतर प्रक्षालनपूजा म्हणजे देवीचा सिंहासनासह गाभारा स्वच्छ करणे. यावेळी येतील ते नैवेद्य दाखविणे, यासमयी येणाऱ्या लोकांच्या कपाळास चरणावरील कुंकू लावणे (दिवसभर कुंकू लावण्याचे काम पुजारी करत असतो), प्रक्षालन पुजेनंतर देवीजींची धुपारती करुन काकडा-आरती व कर्पुरारती केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद करुन बाहेर येणे, कुलूपाची चावी आपल्यासोबत ठेवून आपल्या ओसरीला राहणे..
वर पाहिल्याप्रमाणे या मठाच्या महंतांची सेवा किती खडतर आहे हे ध्यानात येईल. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मठाकडे पूर्वी छत्रे, अबदागिरीवाला, पलंगे, पंखेवाला, तेलकाठी, पाणीवाला असे विविध सेवेधारी होते. त्यांच्या सहाय्याने महंतांना आपली सेवा बजावावी लागते. आता दिवे गेले, वीज आली त्यामुळे तेलकाड्याचे काम कमी झाले तरी परंतू बऱ्याच सेवा आजही कायम आहेत. यामध्ये पुढीलप्रमाणे मुख्य सेवेचा समावेश होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडव्यादिवशी मंदिरावर शिखरालगत गुढी उभारणे, आषाढ मासात नंदादिपाची स्वच्छता करणे, तुळजाभवानीची मूळ मूर्ती वर्षातून तीनवेळा सिंहासनावरुन काढून शयनकक्षात निद्राकालासाठी झोपविली जाते. यावेळी पुजाऱ्यासह मदत करणे व मुर्ती सिंहासनावर बसविल्यानंतर पादुकाच्या बाजूने फट राहू नये म्हणून मेणाचा थर दिला जातो. त्यासाठी लागणारे १०१ मुठी मेण पुरविणे, बैलपोळा, घटस्थापना व उत्थापन करणे, अजाबली विधीत सहभाग घेणे. भाद्रपद अमावस्येला गोमुख कोंडून पाणी जमा झाल्यानंतर गाभाऱ्यासह मंदिर परिसर स्वच्छ करुन घेणे, ही स्वच्छता वर्षातून तीनवेळा होते. यावेळी गाभारा बंद केला जातो. तुलसी विवाह साजरा करणे, रंगपंचमीदिवशी देवीला पांढरी साडी घातल्यानंतर रंग टाकणे, भेंडोळीची पूजा करणे, गौरी गणपतीचा उत्सव साजरा करणे, होळी साजरी करुन मठातर्फे मानाचा नैवेद्य दाखविणे, होमाशिवाय गाभाऱ्यात जे बलिदान होते त्याचा नैवेद्य देवीला दाखविणे, अभिषेक पुजेसाठी येणारे दही, दूध, श्रीखंड, बासुंदी इत्यादी साहित्याची योग्यता पाहणे, भोपे पुजाऱ्यांच्या मुलाला प्रथम पुजेला घालतानाच्या विधीच्यावेळी त्याला जानवे घालणे, नरकचतुर्थी दिवशी देवीला उष्णोदक (गरम पाण्याने) स्नान घालण्यासाठी गरम पाणी, उटणे, सुगंधी तेल लावणे व इतर धार्मिक विधी पार पाडणे हे सर्व करत असतानाच चिलोजीबुवाच्या मठाधिपतीच्या गैरहजेरीत त्यांचीही सेवा बजावणे. आपला चेला नेमणे, ब्रम्हचर्येचे पालन करत रात्रंदिवस देवीची सेवा करताना करावी लागणारी कसरत फारच कठीण आहे..
Dr.satish kadam
वाकोजीबुवा मठाच्या सेवेत मोठ्या प्रमाणावर पाण्याची सेवा येत असल्याने या मठाला पानेरी मठ असेही म्हटले जाते. परंतू एका दानपत्रातील संदर्भामध्ये विठोजी पानेरी अशाप्रकारचा उल्लेख आल्याने पानेरी कोणाचे आडनाव होते की, तो पाण्याची सेवा करत होता हे निश्चित होत नाही. यासोबतचे गादीवर बसणाऱ्या महंतांना वाकोजी, बजाजी व तुकोजी याप्रमाणे नावे स्वीकारताना त्यामागची परंपरा काय होती हेही समजत नाही..
वाकोजीबुवा मठातही तुळजाभवानीचे प्रतिकात्मकरुप म्हणून सिंहासनारुढ अन्नपुर्णेची मूर्ती आहे. त्याचेही सर्व सोपस्कार तुळजाभवानीप्रमाणेच पार पाडावे लागतात. दर पौर्णिमेला महंतांना मंदिर परिसरात मानाचा जोगवा मागता येतो. तसेच चरणतीर्थ आणि प्रक्षालन पुजेच्या वेळी जमा होणाऱ्या रकमेतील महंतांना सेवेधाऱ्यासह आपल्या मठाची व्यवस्था लावता येते. याशिवाय वाकोजीबुवा मठाकडे एक हजार एकरावर जमीन असली तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे नगण्य आहे. तुळजाभवानी मंदिराची चावी सांभाळणारा वाकोजीबुवाचा मठ महत्वाचा असून, मंदिराबाहेर असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मठामध्ये तळघराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावरुन मध्ययुगातील हालचालीचा अंदाज येतो. एकंदर हे शाक्तपीठ असल्याने थेट पुजाविधी पार पाडताना महंतांना करावी लागणारी सेवा ही शारीरिकदृष्ट्या अतिशय कष्टमय असली तरी अखेर ती तुळजाभवानीची आहे यातच भाग्य म्हणावे लागेल.! .
Dr.satish kadam 9422650044 strictly intimation dont copy paste.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या