देवी जिथं सारीपाट खेळते तो भारतीबुवांचा मठ

03 Sep 2017 दै.पुण्यनगरी
pls dont copy paste karwai keli jail.
प्रा. डाॕ. सतीश कदम, तुळजापूर..9422650044
http://www.epunyanagari.com

तुळजाभवानी मंदिराच्या पश्चिमेला महाद्वारापासून जवळील भारतीबुवाच्या मठामध्ये दररोज देवी सारीपाट खेळण्यासाठी जातात. अशा प्रकारची आख्यायिका असून, आजही देवीला हाक मारुन बोलविले जाते. या मठाला मध्ययुगीन कालखंडात महत्वाचे स्थान होते. विविध भागातून येणारे राजे-महाराजे, सरदार आणि भक्तांना राहण्याचे ठिकाण म्हणून भारतीबुवाचा मठ म्हणजे हक्काचे ठिकाण होते. या मठाची स्थापना श्री रणछोडदास भारती या सत्पुरुषाने केलेली असून, तुळजापूरलगत सिंदफळ शिवारात सर्व्हे नं. २०२ मध्ये एकूण २५ एकर जमिनीपैकी ३.५ एकरावर अतिशय घडीव बांधकामात हा मठ असून, मठाचे बांधकाम पूर्णपणे मराठा शैलीतील असले तरी रणछोडदास भारती, त्यानंतरचे गणेश भारती व गोविंद भारती यांच्या समाधी मात्र पूर्णपणे मुस्लिम शैलीतील आहेत. त्यामुळे मठ प्राचीन असला तरी बांधकामाचा कार्यकाल हा ३०० ते ३५० वर्षाखालील आहे. सध्याचे मठाधिपती महंत गणेश गुरू भीमसेन हे गादीचे १४ वे गुरू असून, ते तुळजापूर तालुक्यातील डोंगरे नामक मराठा कुटूंबातून आलेले आहेत..

रणछोडजी हे श्रीकृष्णाला पडलेले एक नाव असून, श्रीकृष्ण जरासंध आणि कालयवन यांना भिऊन मथुरेतून द्वारका या ठिकाणी आले. त्यामुळे त्यांना रणछोड हे नाव दिले गेले.तसं पाहिलं तर द्वारकानगरी म्हणजे सात मोक्षधाम आणि चार धामापैकी एक असून, त्यांनीच द्वारकेची उभारणी केली. १७० फुट उंचीच्या येथील श्रीकृष्ण मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात वरच्या मजल्यावर अंबादेवीचे मंदिर आहे. अशाच प्रकारचे एक मंदिर कच्छमध्येही आहे. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, ज्ञानेश्वर, महानुभाव पंथाचे चांगदेव राऊळ, संत मीराबाई, गुजरातचा नरसिंह मेहता हे रणछोडजीचे भक्त होते. रणछोड हे श्रीकृष्णाचे म्हणजेच पर्यायाने विष्णूचे एक नाव आहे तर तुळजापूर म्हणजे शैव आणि शाक्त संप्रदायाचे पीठ आहे. त्यामुळे यातील भेद जाणून घेणे गरजेचे आहे..

साहजिकच भारतीनामक गोसाव्याने रणछोड हे नाम धारण करुन यमुनाचल प्रांतातील चिंचपूर अथवा तुळजापूर या ठिकाणी एका घनदाट अशा अरण्यात एका मठाची स्थापना केली. नंतर त्याच ठिकाणी ते समाधीस्त झाले. म्हणून या मठाला भारतीबुवाचा मठ म्हटले जाते. गोसाव्यामध्ये गिरी, पुरी, भारती याप्रमाणे नावे असून, गोसावी व गोस्वामी या शब्दाचा अर्थ होतो गोधनाचा मालक. अर्थातच ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर गोधन आहे. भारतीय संस्कृतीकोशाच्या तिसऱ्या खंडात या विषयी छान विवेचन आहे. तर इ. स. पूर्व ३५० मध्ये होवून गेलेला ग्रीक इतिहासकार मॅगेस्थिनिजने आपल्या इंडिका नावाच्या ग्रंथात संन्याशाविषयी सविस्तर लिखाण केले आहे..

गोसाव्यात तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती, पुरी ही दहा उपनामे वापरतात. पैकी भारती कोणाला म्हणजे याविषयी मठाम्नामात पुढीलप्रमाणे वर्णन सापडते..

विद्याभारेण संपूर्ण: सर्वभारं परित्यजनं ।.

दु:खभारं न जानाति भारती परिकीत्यते।।.

म्हणजेच संसारातील सर्वभार टाकून देवून फक्त विद्येचा भार बाळगणारा व ज्याला दु:खाचा भार माहित नाही, असा तो म्हणजे भारती होय..

वैदिक धर्माच्या प्रसाराबरोबरच गोसाव्यांनी क्षत्रिय धर्माचे पालन करत भारतावर आक्रमण केलेल्या सिकंदर, औरंगजेब यासारख्या आक्रमकाविरोधात हातात शस्र घेवून चिवट झुंज दिलेली आहे. त्यामुळे त्यांना फारच कठीण परिस्थितीतून जावे लागल्याने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेतला. साहजिकच त्यामुळे सांप्रत गोसावी वर्गात क्षत्रिय जातीनेही प्रवेश केला. त्यामुळे गोसावी म्हणजेच एक पंथ निर्माण झाला. ज्याला इच्छा असेल त्याला दीक्षा घेवून या पंथात जाता येते. गोसाव्याची परंपरा पितृसत्ताक नसून ती गुरुसत्ताक असल्याने त्याला त्या दिवशी नवीन नाव देतात. (तुळजापुरातील भारतीबुवाच्या मठाच्या मठाधिपती गुरु भीमसेननी सध्याच्या मठाधिपतीला गणेशभारती हे नाव दिलेले आहे) त्यानंतर एक-दोन वर्षानंतर त्याला आचार-विचारांची ओळख झाल्यानंतर गुरु शिष्याच्या कानात 'ओम सोहम' हा मंत्र मोठ्याने उच्चारतो. मग तो पक्का मठाधिपती बनतो. त्याने आपल्या पंथाशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्याला मीठ खायला देतात.नंतर तो भगवी वस्रे परिधान करुन पुढील कार्यभार सांभाळतो. तुळजापुरातील मठांमध्ये मधल्याकाळात अनेक स्थित्यंतरे झाल्यामुळे वरील उपचारांचे पालन झालेच असेल असे नाही. तरीपरंतु दिक्षाविधीचा हा प्रघात आहे..

वर वर्णन केल्याप्रमाणे रणछोड हे वैष्णवपंथीय नाव असले तरी ते शैवपंथीय गोसाव्यानेही स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे गोसाव्यांमध्येही शैव आणि वैष्णव असे दोन पंथ आहेत. शैव पंथाचे गोसावी मठाधारी तर वैष्णवांचे घरबारी म्हणून ओळखले जातात. दुसरे आसाम, बंगाल सोडून इतरत्र शैवपंथीय गोसावी वावरताना दिसून येतात. साहजिकच वर्णन केलेल्या सर्व मात्रा या तुळजापुरातील भारतीबुवाच्या मठाला लागू पडतात. गत पाच पिढ्यांपासून या मठावर मराठा समाजातील तरुणाने ब्रम्हचारी वृत्तधारण करुन मठाचे कामकाज सांभाळले आहे. पूर्वीचे गजेंद्र भारती तुळजापूरजवळील मसल्याच्या दळवी घराण्यातील तर त्यानंतर चंद्रशेखर, भीमसेन व सध्याचे गणेश भारती हे मंगरुळच्या डोंगरे परिवारातील आहेत. सोलापूर-तुळजापूर हायवेवर बार्शी चौकालगत भारतीबुवाचा मठ असून, सर्वसामान्य यात्रेकरुंना उतरण्याची व्यवस्था करुन अन्नछत्र चालविणे हे या मठाचे मुख्य काम आहे. .( dr satish kadam 9422650044 )

येथील रणछोडबुवांना शंकराचा अवतार मानल्याने रात्रीच्या वेळी देवी सारीपाट खेळण्याकरिता या मठात येते अशी आख्यायिका आहे. त्यानुसार मठामध्ये आजही सारीपाट मांडला जातो. सकाळी त्यामध्ये बराच बदल होत असल्याची भक्तांची भावना आहे. वैवाहिक जीवनाचा सारीपाट नीट चालावा म्हणून अनेक भक्त या ठिकाणी असलेल्या जगदंबा देवीच्या दर्शनानंतर सारीपाटाचे दर्शन घेतात. सारपाटामध्ये मग्न असलेल्या देवीला स्नानसंध्या करुन पुजाअर्चेला मंदिरात बोलावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाद्वारातून 'आई हो लवकर या' म्हणून मोठी आरोळी दिली जाते. नेपाळमधील देगू तलेजू (देवी तुळजाभवानी) मंदिरातही सारीपाटाची प्रथा आहे. या ठिकाणी राजाचे नाव जयप्रकाश मल्ल हा नावातला बदल म्हणावा लागतो. एकंदर तुळजाभवानी तीर्थक्षेत्रातील अनेक प्राचीन प्रथापरंपरा आहेत ज्या आजही जपल्या आहेत. सारीपाटाच्या सोंगट्याप्रमाणे त्यात काही मागे-पुढे झालेले आहे. मात्र भक्तीचा डावमात्र कायम आहे. (क्रमश:) .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या