तुळजाभवानी मंदिर स्थापत्य

तुळजाभवानी मंदिर स्थापत्य 
देव-देवतांच्या धार्मिक भावनेतून मानवाने देवालयाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. 'देवस्य देवानां वा आलय:' या उक्तीनुसार जेथे एखाद्या देवतेची मुर्ती किंवा प्रतिक बसविलेले असते, त्याला देवालय म्हटले जात असलेतरी ते नुसते देवांचे वस्तीस्थानच नाही तर त्यांचे शरीरच या संकल्पनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. अग्निपुराणातील या श्लोकावरुन हे स्पष्ट होते..
शिखरं शिर इत्यादुर्गर्भगेहं गलस्तथा।.
मण्डपं कुक्षिरित्याहू:प्राकारं जानुजड:घकम् ।.
गोपूरं पाद इत्याहूध्वजो .
जीवनमुच्यते ।.
याचा अर्थ होतो देवालयाचे शिखर म्हणजे शिर अर्थात डोके, गर्भगृह म्हणजे गळा, मंडप म्हणजे कुस, प्राकार म्हणजे मांड्या व पिंडऱ्या, गोपूर म्हणजे पाय तर मंदिरावरील ध्वज हा शरिरातील जीव मानला गेला आहे. अखिल भारतातील देवालयाचा आढावा घेतल्यास मंदिर शैलीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. गर्भगृहात मुर्तीवर शिखर ही संकल्पना प्राचीन काळापासूनच रुढ झाल्याचे दिसून येते. देवीच्या उगमाचा आढावा घेतल्यानंतर दैत्यांचा संहार व प्राचीन काळातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला तर डोंगरदऱ्यातच देवीचे वसतिस्थान असल्याचे दिसून येते. यमुनाचल प्रदेश, बालाघाट व सप्तशृंग डोंगर ही त्याची उदाहरणे आहेत. अशा डोंगर परिसरात मानवाने कोरलेल्या मंदिराला शिखराचा भाग आपोआपच निर्माण झाला. पुढे अवकाशाला गवसणी घालण्याची संकल्पना शिखरातून उत्पन्न झाली. परंतू धर्मशास्रानुसार रथाचा छत किंवा विष्णूच्या किरीट मुकूटाचा आकार यामुळे शिखराची संकल्पना रुढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मंदिर म्हटल्यानंतर शिखर ही कल्पना मूर्त झाली. मंदिर स्थापत्यशैलीचा अभ्यास करताना मंदिराची रचना ही याप्रमाणे दिसून येते. त्यानुसार मंदिराच्या गर्भगृहात देवताची मूर्ती, त्यापुढे चौकोनी मंडप तर गर्भगृह आणि मंडप ज्या एका लहानशा भागाने जोडलेला असतो त्याला अंतराळ म्हणतात. मंडपाच्या पुढच्या भागाला अर्धमंडप म्हणतात. यातून मंदिरात प्रवेश करायचा असतो. गर्भगृहावर शिखर तर सभोवती प्रांगणात छोटी-छोटी मंदिरे, छोट्याशा चबुतऱ्यावर असतात. ज्याला ओवऱ्या म्हणतात. मुख्य मंदिराचे शिखर हे इतरांपेक्षा उंच असावे ही संकल्पना मांडली गेली आहे. हीच बांधकामशैली तुळजाभवानी मंदिराच्या स्थापत्यातही दिसून येते. प्राचीन कालखंडातील मंदिर स्थापत्यशैलीचे नागर, द्राविड व वेसर हे प्रकार असून तुळजाभवानी मंदिर या प्रकारात बसत नाही. .
तुळजाभवानी मंदिर हे प्राचीन असून, साडेतीन शक्तीपीठातील आद्यशक्तीपीठ म्हणून या मंदिराची गणना होत असली तरी हे मंदिर कोणत्या कालखंडातील आहे स्पष्टपणे सापडत नसल्याने त्याच्या बांधकाम शैलीचाही निश्चित अंदाज येणे कठीण जाते. कारण कालखंडानुसार बांधकामशैली ठरत असते. तुळजाभवानी मंदिराच्या बाबतीत एक बाब स्पष्टपणे नमुद करावीशी वाटते की, सत्ता बदलत गेल्या त्याप्रमाणात बांधकामात बदल होत गेलेले आहेत. .
तुळजाभवानीच्या बाबतीत सर्वात खेदाची बाब म्हणजे कमी प्रमाणात उपलब्ध असणारी साधन सामुग्री होय. एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय आश्रय असणाऱ्या मंदिराबाबत तत्कालीन कालखंडात लेखन का केले नाही? हे स्पष्ट होत नाही.मंदिर स्थापत्य शैलीचा आढावा घेताना उपलब्ध साधन सामुग्रीचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की, तुळजापुरातील लिखित स्वरुपातील पुरावे हे इ. स. १५१० च्या सुमारास आदिलशाहने दिलेली दानपत्रे मिळालेली आहेत. त्यानंतर पुढे मराठे, पेशवे, हैद्राबादच्या निजामापर्यंत अनेक कागद आहेत..
यातून एक बाब स्पष्ट होते की, सत्ताधीशांनी दानपत्र देताना मंदिराच्या परिसरातील इतर बाबींचा उल्लेख केलेला आहे. याचाच अर्थ किमान यादव कालखंडापासून म्हणजे बाराव्या शतकापासून तरी मंदिराचे बांधकाम हे तत्कालीन कालखंडातील एक भक्कम मंदिर असावे अन्यथा सेवेसाठी दान देणाऱ्या राज्यकर्त्यांना त्यांचे बांधकाम करणे अवघड नव्हते..
गतकाळातील घटनांचा मागोवा घेतला असता याठिकाणी स्पष्टपणे नमुद करावेसे वाटते की, फार पुर्वीपासून इथे त्या-त्या कालखंडानुरुप भव्य मंदिर होते. परंतु, तुळजाभवानीच्या भक्तीचा महिमा जसजसा वाढत गेला, त्यानुसार अतिव भक्तीतून मंदिराच्या बांधकामातही भर पडत गेली..
देवगिरीच्या यादवांचा कालखंड हा बारावे शतक असून त्यांचा प्रधान हेमाद्रीपंत पंडीत हा परभणी जिल्ह्यातील. म्हणजे त्यालाही या परिसराची चांगलीच जाण होती हे स्पष्टच आहे. आज जे मुख्यमंदिर दिसते, ते याच हेमाद्रीच्या देखरेखीखाली बांधलेले यादव शैलीतील मंदिर असावे. एकंदर श्री तुळजाभवानीचे मुख्य मंदिर हे यादवकालीन हेमाद्री शैलीचे असून या प्रकारातील बांधकामाकरिता दगडी पाषाणाचा वापर करताना दगडाच्या बांधणीकरिता माती, चुना वापरण्यापेक्षा उखळीच्या सांध्याची जोड दिलेली आढळते..
याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या अगोदर या ठिकाणी मंदिराचे बांधकाम नगण्य स्वरुपातील होते. याठिकाणी असलेल्या बांधकामाचा आढावा घेतल्यानंतर हे स्पष्ट जाणवते की, पूर्वीचे बांधकाम हे किल्लेवजा असावे. काळभैरवाकडून आज जो दर्शन मंडप काढलेला आहे, त्यावेळी दक्षिणेकडील बाजूच्या भिंतीतून भुयारी मार्ग काढताना त्या भिंतीची जाडी १२ ते १४ फुटापर्यंत आढळून आलेली आहे. .
यादवकालीन हेमाद्रीने बांधलेल्या शैलीत तुळजाभवानीची तट भिंत येत नाही. ती भिंत किल्ल्याच्या तटभिंतीसारखी आहे. त्यामुळे या भिंतीच्या बांधकामाची प्राचीनता ही त्याही मागे म्हणजे ४ ते ७ व्या शतकापर्यंत जाते हे महत्वाचे आहे. .
त्यामुळे प्राचीन कालखंडातील मंदिर हे किल्लेवजा बांधकाम शैलीत असून मंदिराला भक्कम अशी तटबंदी होती. आज प्रवेशद्वाराचा विचार करता मुख्य प्रवेशद्वार ज्याला सरदार निंबाळकर दरवाजा व टोळभैरव दरवाजा म्हटले जाते. हे दरवाजे सुद्धा प्राचीन तटंबदीला पाडून बांधल्याचे पुरावे दिसून येतात. याची बांधणी करणारे निंबाळकर हे १८ व्या शतकातील आहेत. .
प्रवेशद्वारापूर्वी त्याठिकाणीच पूर्वीचे उत्तम शैलीतील बांधकाम होते हे जाणून घ्यायचे असेल तर टोळोबा दरवाजाचे निरीक्षण केल्यास त्या ठिकाणीच्या भिंतीवर असणारी गजशिल्प हे प्राचीन बांधकामाची साक्ष आहे.भाग -१.(क्रमश:) .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या