कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचा इतिहास


 कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचा इतिहास 



राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर 9 किमी लांबीच्या महाराष्ट्रातील प्रमुख घाटापैकी एक असणार्‍या कन्नड चाळीसगाव दरम्यानच्या ओट्राम घाटाच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. उत्तर भारतातून दक्षिणेत जाण्यासाठी अजिंठ्याचा डोंगर पालथा घालवा लागतो. याकरिता आपणास रांजनगाव आणि अजिंठा पास फर्दापूर येथून जावे लागते.  प्राचीनकाळी मात्र खानदेशातून मराठवाड्यात येण्यासाठी विविध नावाने छोटे मोठे घाट होते. ज्याची आज फक्त नावानेच चर्चा करावी लागते.
1.       कालघाट पाटणा ते आंबा ( कन्नडजवळील पाटणा गणितीतज्ञ भास्कराचार्याचे गाव
2.       घायघाट – अहंकारी ते अंबाला
3.       गणेशघाट – पाटणा ते कलंकी
4.       हणवत घाट – पिंपळनेर  ते लोध्रा
5.       शेकसोंडा घाट - खर्डी ते लोध्रा
असे घाट असलेतरी आज फक्त औट्रम किंवा गौताळा घाटाचाच वापर होतो. ज्याला चाळीसगाव किंवा कन्नडचा घाटही म्हटले जाते. ज्यामध्ये कन्नड ते चाळीसगावच्या दरम्यान असणार्‍या तळ्याकाठी प्राचीन काळी गवळी लोक आपल्या गाई चारायचे म्हणून याला गौताळा हे नाव पडले. मात्र औट्रमचे नाव का व कशामुळे पडले हा इतिहास मोठा रंजक आहे.

·        * औट्रम कोण होता

कागदोपत्री ज्याच्या नावाने हा घाट आहे तो सर जेम्स औट्रम म्हणजे हा ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारातील ब्रिटिश सैन्याचा भारतातील एक अधिकारी होता. लंडनमधील वेस्टमिस्टर येथे 29 जानेवरी 1803 रोजी जन्म झाला. वडिलांचे लवकरच निधन झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला वाढविले. आणि वयाच्या 22 व्या वर्षी तो लष्करात भरती होऊन तो भारतात लेफ्टनंट म्हणून दाखल झाला. आपल्याकडे ज्याप्रमाणे पहिली पोस्टिंग म्हणून गडचिरोलीला पाठवतात त्याप्रमाणे 5 ऑगस्ट 1819 ला औट्रमला 4 th Native Infantry Battalion मध्ये भरती करून त्याला खानदेशात  पाठविण्यात आले. त्याकाळी धरणगाव हे खानदेशचे उपविभागीय केंद्र असलेतरी याठिकाणी जिल्हा कार्यालय, जिल्हा पोलिस कार्यालय अशी महत्वाची कार्यालये होती. तेथेच औट्रमने आपले झोपडीवजा कार्यालय थाटले. प्रत्यक्षपणे 1825 ते 1836 पर्यन्त औट्रम खानदेशात वास्तव्यास होता. पुढे त्याने आपल्या निवासस्थांनासाठी मोठा बंगला बांधला जो पुढे विविध कार्यालयासाठी वापरला जाऊ लागला.  त्यावर शिलालेख लिहिलेला होता, त्यावर “ हिंदुस्थानचे बेयर्ड , निष्कलंक व निर्दोष सरदार” होण्याचा पाया येथे घातला असे लिहिलेले आहे.  
·        त्यावेळची खानदेशातील परिस्थिती
इंग्रजांच्या कालखंडात खानदेश ( धुळे, नंदुरबार, जळगाव आणि एरोंडोल ) हा एक जिल्हा होता. खानदेश ब्रिटीशांच्या ताब्यात असून त्यांची छावणी धरणगाव याठिकाणी होती. ब्रिटीशांना राज्यकारभार करताना सर्वात मोठी अडचण ही आदिवासी भिल्लाची होती. खानदेशातून वर जाताना घाटामध्ये या भिल्लांच्या टोळ्या लूटमार करायच्या. सोबतच यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात केली. काजीसिंग, भीमा, भागोजि, मेवाश्या,काळूबाबा, महादेव आणि खंडू नाईक इत्यादींच्या टोळ्यांनी इंग्रजांना मोठा उपद्रव देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे इंग्रजांचा बराचसा पैसा आणि सैन्य खर्च करावे लागत होते.
·        खानदेशातील भिल्लविरोधात औट्रमची अनोखी शक्कल
1819 ते 1836 या दरम्यान औट्रम खानदेशात कार्यरत होता. या दरम्यान त्याने अनेक नावीन्यपूर्ण योजना आखल्या. ज्या भिल्लांच्या विरोधात इंग्रजांना मोठी शक्ति खर्चावी लागत होती, त्याच भिल्लांना औट्रमने आपले body guard म्हणून नेमले. येवढेच नाहीतर भिल्लाची स्वतंत्र फलटण ( Bhill Regiment ) उभी करून  जुन 1826 ला त्यांच्यासाठी धरणगावात मोठी वसाहत बांधली. या आदिवासीचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने कधी कधी आपला मुक्काम त्यांच्यासोबत घनदाट जंगलात घालविला. त्यावेळी गौताळा अभयारण्यात जंगली श्वापदांचा मोठा वावर होता. त्यासाठी स्वत: हातात बंदूक घेऊन त्याने त्यांचा बंदोबस्त केला. 1825 ते 1836 च्या दरम्यान त्याने 235 वाघ, 16 चित्ते, 25 हरिण, 12 गवे मारल्याची नोंद सापडते. त्यामुळे आदिवासीचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याचा फायदा घेत त्याने भिल्लांना पोलिस, जकात नाके अशा विविध कामावर लावले. येवढेच नाहीतर औट्रमने उभा केलेली भिल्ल रेजिमेंट वापर पुढे ज्या ज्या ठिकाणी आदिवासींचे उठाव व्हायला लागले तेथे होऊ लागला.
साहजिकच रांजनगाव, आंबा नावाने ओळखला जाणारा घाट आता लुटारूपासून सुरक्षित झाला. आपल्या हयातीत औट्रमने या घाटाची काही प्रमाणात दुरूस्ती केली.  

·       *  ईस्ट इंडिया कंपनीसाठी औट्रमचे कार्य

कंपनीसाठी लष्करी सेवा बजावत असताना औट्रमने मनापासून दिले. गुजरात, कलकत्ता, ओस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा अनेकठिकाणी त्याने आपले कार्य उत्तमरीतीने पार पाडले. लखनौ आणि अवध संस्थानचे रेसिडेंट म्हणून काम पहिले. स्वत:च्या हिंमतीवर पुढे तो भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहोचला. 1830 साली सूरत येथील डांग लोकांनी केलेल्या बंडात औट्रमने महत्वपूर्ण कामगिरी करत हा उठाव मोडीत काढण्यासाठी Bhill auxiliaries चा वापर केला. 1857 च्या उठावात त्याने केलेल्या कामगिरीबाबत लंडनच्या सभागृहाने औट्रमच्या अभिनंदनाचा ठराव पास करून त्याला रोख 1000 डॉलर आणि  Boronet ” ही पदवी दिली.  जुलै 1860 साली स्वत:चे ई लाख रुपये खर्चून त्याने कोलकत्ता येथे Outram Institute नावाची सैनिकासाठी एक स्वतंत्र संस्था सुरू केली. अशारीतीने ईस्ट इंडिया कंपनीसाठी औट्रम हा इंग्रजांच्या गळ्यातील ताईत बनला.

·    *    औट्रमचा सन्मान

दुसर्‍या महायुद्धासह ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तेथे औट्रम आपल्या लष्करी सेवेसाठी हजर राहिला.   प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्याने शेवटी तो लंडनला परत गेला. 11 मार्च 1863 रोजी या महान सेनानीने जगाचा निरोप घेतला. यावेळी Times Of India ने औट्रमच्या दुख:द निधनाची बातमी देताना एक छान ओळ वापरली होती. “ No Lips will Open ” सलग 40 वर्षे त्याने लष्कराची सेवा केली. शासकीय इतमामात त्याचा अंत्यसंस्कार करून त्याची कबर बांधल्यानंतर त्यावर कोरलेली अक्षरे फार बोलकी आहेत.
 Sir James Outram
Lieutenant General Outram
His Life was given to India, Faithful Servant of England ”
The Bayard Of India
·       >   1863 ला लंडनमध्ये त्याचा पूर्णाकृती पुतळा उभा केला.
·        > कोलकत्ता येथेही घोड्यावर स्वार असलेला पूर्णाकृती पुतळा आहे. औट्रमच्या नावाने हुगळी नदीवर घाट बांधलेला आहे ज्याठिकाणाहून जहाजाची ये जा चालू असते. आजही हा घाट अतिशय प्रसिद्ध आहे.
·        >  सिंगापूरला औट्रमच्या नावाने रोड आहे.
·        > दिल्लीतील एका रस्त्याला औट्रमचे नाव आहे.त्याला outram Line म्हटले जाते.
·        > पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आजच्या जमशेदाबादचे नाव पूर्वी औट्रमच होते.
·       >  न्यूझीलंडमधील डूनेनिन भागात औट्रम नावाने एक गाव आहे.
·       ·       शतरंज के खिलाडी नावाच्या सिनेमात औट्रमवर खूप काही प्रकाश टाकलेला आहे. विशेष म्हणजे त्याची भूमिका रिचर्ड अटीनब्युरो ने पार पाडलेली आहे.

           * औट्रमच्या नावाने घाटाचे नामांतर

चाळीसगाववरून कन्नडला जाण्यासाठी आता जो घाट वापरला जातो त्याला पूर्वी आंबा घाट, रांजनगाव पास अशी विविध नावे आहेत. खरंतर 1681 साली औरंगजेबाने या घाटाला प्रथमत: दुरुस्त केलेले आहे. त्यानंतर इंग्रजांच्या काळात औट्रमने 1827 साली भिल्लांच्या मदतीने घाटाचे बरेचसे काम काम केले होते.
1869 -70 मध्ये खानदेशात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा सरकारने 1, 84, 260 रुपयाचा निधि मंजूर केला होता तर चाळीसगाव कन्नड घाटासाठी 20,000 रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे प्रथमच हा घाट खडीकरण करून मजबूत झाल्याने तो  मोटर गाडी जाण्यासाठी सज्ज झाला. तेव्हा 1872 ला खानदेशचे कलेक्टर एशबरनर (L. R.  Ashburner ) यांनी या घाटाचे उद्घाटन केले आणि घाटाचे नामांतर “ Outram Ghat ” असे केले जे आज रुजू झालेले आहे. 
( Dr. satish Kadam, Tuljapur (9422650044)
 dont copy without Author name 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या