तुळजाभवानीच्या मूर्तीसाठी जिथून दगड आणला ती गंडकी नदी
कदमसर |
गंडकी हे नाव ऐकल्यानंतर आपणास तुळजापूरची आणि प्रतापगडाची श्री तुळजाभवानी समोर दिसते. त्यानुसार आपण कुठेनाकुठेतरी याबाबत वाचलेले आहे, ऐकलेले आहे. त्यानुसार तुळजाभवानीची मूर्ति ही गंडकी पाषानातून बनविण्यात आल्याचे सर्वज्ञात आहे. याबाबत श्री क्षेत्र तूळजापूर येथील जवळपास शंभर वर्षापूर्वी लिहीलेल्या “महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात तुळजाभवानी “ या पुस्तकातील लेखांक क्रमांक 21, पृष्ठ क्रमांक 36 मधील वर्णनानुसार देवळाचे प्रधान जगदेवराव ( आडनावाचा उल्लेख नाही) यांनी 890 हिजरी म्हणजेच इ.स. 1469 साली देवळाचा पाया तयार केला. माघाहून 910 हिजरी म्हणजेच इ.स. 1489 साली आदिलशाहाचे जहागीरदार निंबाळकर ( नावाचा उल्लेख नाही ) यांनी चिंचपूरचे नाव बदलून तुळजापूर ठेविले. तत्पूर्वी आमर बादशहाचे ( हा कोण उल्लेख नाही ) कामदार व येथील पुजारी या उभयंतानी मिळून अनागोंदीहून गंडकी शिळाची मूर्ति आणून सन हिजरीत स्थापन केली. साहजिकच याठिकाणी गंडकी हा शब्द आला. पुस्तकातील वर्णनाबरोबरच येथील पुजारी वा जाणकार अशा सर्वांच्याच तोंडी तुळजाभवानीची मुर्ती ही नेपाळमधील गंडकी पाषानापासून बनविण्यात आलेली आहे हे वाक्य सहजपणे उच्चारण्यात येते.
छत्रपती शिवाजीमहाराज आणि आई तुळजाभवानी यांचे भक्तिमय नाते उभ्या जगाला माहीत आहे. त्यांच्या अनेक पत्रावर “ श्री महादेव श्री तुळजाभवानी “ असा उल्लेख आढळतो. तर त्यांच्या वापरात असणार्या मानाच्या तलवारीची नावेच मुळी ‘ तुळजा आणि भवानी तलवार’ अशी आहेत. यातूनच इ.स. 1659 साली आदिलशाही सरदार अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने प्रथम तुळजाभवानी मंदिराला उपसर्ग दिला. अशाप्रकारचे वर्णन अनेक दुय्यम साधने, बखरीत आढळून येते. याठिकाणी अफजलखानाने काय केले याविषयी चर्चा अपेक्षित नसून या स्वारीनंतर राजांनी काय केले हे अपेक्षित आहे. त्यानुसार अफझलखान वधांनंतर ( 10 नोव्हेबर 1659 ) राजांनी तुळजापूरला जाऊन देवीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित केल्यानंतर काय झाले याचे वर्णन अनेक बखरीत आलेले आहे.
1. चिटणीस बखर – अफझलखान मारल्यानंतर श्री देवीच्या दर्शनास जाण्याची महाराजांनी तयारी केली, तेव्हा श्रीने दृष्टान्त दिला की, आपणास मुर्ती करून येथेच स्थापना कर म्हणजे जे तुझे नवस मानसिक ते तेथेच पुरविण. यावरून महाराजांनी गंडकशीला आणून कारागीर तुळजापूरी पाठऊन त्याप्रमाणेच मूर्ति सुंदर करून तिची प्रतापगड येथे स्थापना केली.
2. सभासद बखर – आपण अफजलखान तुझे हाते मारविला व कित्येक पुढे आले त्यास पराभवास नेले. पुढेही उदंड कारण करणे आहे. आपण तुझे राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पुजा पूजनप्रकार चालविणे. याउपरी राजियाणी गंडकी नदीस द्रव्य गाडियावर घालून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला.
3. चित्रगुप्त बखर – तुझे सर्वप्रकारे कल्याण करून तुझे हस्ते वैरियाचा पराभव करून संपत्ती संतत्तीसहित राज्याभिवृद्धी करणे आहे. तरी आपली स्थापना करून पुजा उर्ज्या यथाविधि भक्तीभावे चालविणे. आंबेने संगितले ही प्रमाणताच. श्री वचनास अंतर करिता नये यावरून महाराजांनी गंडिका नदीस कारकून शहाणा मनुष्य ऐवज देऊन पाठऊन दिला. त्याने जाऊन तेथे अपूर्व शिळा विलोकन करून ती गाडीयावर घालून काही दिवसांनी महाराजवळ आणली. ते समयी चतुर हुन्नरवंत पाथरुट आणून श्री यथाशास्त्र शिल्पिके निर्मून तयार केली.
साहजिकच दोन्ही उतार्यावरून सहजपणे ध्यानात येते की, तुळजाभवानीच्या दोन्ही ठिकाणच्या मूर्ति ह्या गंडकी शिळेतून बनविण्यात आलेल्या आहेत. वाचनातून असो की ऐकण्यातून आम्हालाही कित्येक दिवसापासून गंडकी नदीविषयी कुतूहल हे होतेच. मागच्याच आठवड्यात ( 15.04.2019 ) अभ्यास दौर्याच्या निमित्ताने बिहारमध्ये जाण्याचा योग आला. पाटण्याहून बेगूसरायकडे जात असताना रस्त्यात हाजीपूर ( प्राचीन काळातील वैशाली प्रांताची राजधानी ) याठिकाणी थांबलो असता पाटण्यातील गंगा नदीच्या तोडीची एक नदी दिसली. तेव्हा शेजार्याला सहज विचारले, गंगा इथंपण लागते का? तेव्हा त्याने संगितले ही गंगा नाही तर गंडकी नदी आहे... गंडकी नाव उच्चारल्याबरोबर आई तुळजाभवानी आणि छ्त्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहिले. मग सुरू झाला गंडकीचा इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा ....
भारतीय संस्कृतिकोशाच्या दुसर्या खंडातील वर्णणानुसार गंडकी ही महानदी असून हिला गंडकीशिवाय चक्रनदी, शालिग्रामी, नारायणी व सदानीरा अशी अनेक नवे आहेत.परंतु गंडकी हे नाव सर्वमान्य नाव आहे. गंडकी नदी तिबेटच्या टेकड्यातून उगम पाऊन नेपाळमधून हिमालय उतरून ती खाली येते. तेथून उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून पुढे बिहारमधील हाजीपूर जवळील सोनपुर गावी गंडकी गंगेला मिळते. बारामहिने वाहणारी गंडकी यादरम्यान 192 मैला ( 1310 किमी ) चा प्रवास पूर्ण करते. पुराणातील वर्णनानुसार भगवान विष्णु हे गंडकीचे पुत्र मानले गेल्याने हिंदू धर्मातही गंडकी नदीला महत्वाचे स्थान आहे. काही ठिकाणी तिला नारायणी तर नेपाळमध्ये गंडकीला सप्त गंडकी, काळी गंडकी, शालिग्राम म्हटले जाते.
महाराष्ट्रातील काळा पाषाण आणि गंडकी पाषाण यात खूप फरक असून मूर्ति घडवताना मूर्तिकाराला गंडकी पाषाण अतिशय टणक असूनही पाहिजे त्याप्रमाणात आकार देता येतो. बाहय वातावरणाचा यावर शेकडो वर्ष यावर काही परिणाम होत नाही. कारण गंडकी पाषणात सिलिकॉन, अल्युमिनियस, पोट्याशियम सोडीयम इत्यादि धातू असतात. इतर दगडाच्यामानाने गंडकी पाषाण अतिशय टणक असूनही गुळगुळीत असतो. त्यात चमक असते. याविषयी शासकीय अभियांञिकी महाविद्यालय, औरंगाबादचे प्राध्यापक आणि भुगर्भ शास्ञज्ञ डाॕ. करमरकर यांनी दगडाविषयी छान माहिती दिली..त्यानुसार गंडकी नदीतील दगड हा सुक्ष्म कणी, त्यातील मिनरलची स्थिरता, त्यातील कठिणपणा आणि पाहिजे तसा मोठा आकार महत्वपुर्ण असल्याचे सांगितले.
छञपतींची दुरदृष्टी किती मोठी होती. स्थानिक दगड ज्याला आपण बेसाॕल्ट म्हणतो तो वरवर कितीही कठिण दिसत असलातरी कालांतराने पुढे तो टिकत नाही. या मुर्त्यावर हवामानाबरोबरच पाणी हवा आणि दुध दही वगैरे घटकांचा परिणाम होतो. त्यामुळे कालांतराने मुर्ती दिसायलाही वेगळी दिसते. भक्तीने आपण मुर्तीवर जे पंचामृत (दही, केळी, मध, लिंबू आणि साखर ) वापरतो त्यामुळेही मुर्तीची झिज होत असते. कारण यामध्ये फार्मिक, अॕसेटिक, ब्युटॕरिटक, सायट्रिक, प्रायोयानिक, व्हलेरिक, पामिटिक अॕसिड असते. दह्यामध्ये लॕक्टिक असते. हे सर्वच पदार्थ आम्लयुक्त असल्याने मुर्तीची झिज होत असते. स्थानिक दगडापेक्षा गंडकी शिलेची त्यामानाने कमी होते. विठ्ठलाची मुर्ती ही गंडकी दगडातील नसल्याने तुळजाभवानीच्या मानाने लवकर झिज होऊ शकते. Dr. Satish kadam
त्यानुसार दोन्ही ठिकाणच्या मूर्तीसाठी गंडकी पाषाण वापरात आणला असलातरी तो नेमका कुठल्या भागातून आणला हे निश्चित सांगता येत नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशात गाळाची जमीन आणि पाण्याचा प्रवाह बारमाही असल्याने व त्यातच नदीची खोलीही खूप आहे. त्यामुळे गंडकी पाषाण हा नेपाळ परिसरातून आणला असावा. परंतु सुरूवातीला अनागोंदी गावाचा उल्लेख आलेला आहे तो मात्र चुकीचा वाटतो. कारण अनागोंदी या नावाचे गाव हे उत्तर भारत आणि नेपाळ परिसरात आढळत नाही. याउलट दक्षिण भारतातील रायचूर जिल्ह्यात अनागोंदी हे गाव आहे. विशेष म्हणजे ते पण तेथील दगडासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गंडकीचा संदर्भ देताना लेखनकर्ता कर्नाटक परिसरातील असावा त्यामुळेच अनागोंदीच संबंध गंडकीशी लावलेला आहे. असो गंडकी नदीतील पाषाण हा सर्वत्र प्रसिद्ध असून नेपाळ भागात विविध आकाराचे दगड पाहण्यास मिळतात. तेथूनच तुळजाभवानीसाठी दगड आणलेला असावा. त्यानिमित्ताने गंडकी नदी जवळून पाहता आली, हे भाग्यच ........डाॕ. सतीश कदम, तुळजापूर. उस्मानाबाद 9422650044
1 टिप्पण्या
Jadhvanchi kuldevi konti aahe
उत्तर द्याहटवाpls tell me what your mind.