रावरंभा निंबाळकर


हे घोडे मी प्राणप्रिय रावरंभासाठी घेतले !

मराठ्यांचा इतिहास हा पराक्रमासोबतच अंतर्गत कलह आणि उच्च-नीचतेचा भेदभाव यानेच जास्त गाजलेला आहे. मनगटाच्या जोरावर गाजविलेल्या तलवारीपेक्षा जन्माने मिळालेले श्रेष्ठत्व मोठे होते. म्हणूनच रानावनात लपवून ठेवलेली माणसं छत्रपती झाली तर केवळ कुळाचा दोष काढत सरदार महादजी शिंदे किंवा रावरंभा निंबाळकर यांसारख्या कर्तृत्ववान लोकांना मराठ्यांनी पाहिजे तो सन्मान कधी दिलाच नाही. नेहमी निजामशहा किंवा आदिलशहाकडे चाकरी करणा-या निंबाळकर घराण्याने रावरंभाला आपलं कधी मानलं नाही. मराठेशाही तोलून धरणा-या महादजी शिंदे व त्यांच्या पुढील पिढीला जे वैभव लाभलं ते हैदराबादची निजामशाही एकखांबी तंबूवर तोलून धरणा-या रावरंभाला पुढे मिळालं नाही. परंतु त्याने रावरंभाची योग्यता कमी होत नाही. इतिहासाची विनंती एकच आहे, माणसाच्या जन्माचा नाही तर कर्माचा विचार करा. 
फलटणचे निंबाळकर घराणे म्हणजे शहाजीराजे ते संभाजीराजांचे मातृकूळ. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे सासर असूनही स्वराज्याच्या उभारणीप्रसंगी निंबाळकरांनी मुस्लिम सत्ताधीशांच्या चाकरीत धन्यता मानली. तरीपण स्वतंत्रपणे तलवार मारणा-या रावरंभाकडे नेहमी वेगळ्या चष्म्यातून पाहिले. शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकरांचे पुत्र महादजीला संभाजीराजांच्या बहीण सखूबाई दिल्या होत्या. याच महादजीचा नातू बाजी निंबाळकरांपासून रंभाजीचा जन्म झाला. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली. १७०७ ला औरंगजेबाच्या निधनानंतर मराठ्यांची गादी ही 
सातारा आणि कोल्हापूर अशी विभागल्याने अंतर्गत कलह वाढल्याने चंद्रसेन जाधव, हिंमतबहाद्दुर उदाजी चव्हाण, नेताजी शिंदे, मानाजी फाकडे व रंभाजीसारखे सरदार निजामाला जाऊन मिळाले. त्यामुळे निजामाचे आसन स्थिर झाले व त्याने रंभाजीला रावरंभा ही पदवी आणि ५२ लाखांची जहागिर दिली. रावरंभा घराण्यात रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्यासारख्यांनी शेवटपर्यंत निजामशाही तोलून धरली. प्रत्येकाला रावरंभा पदवी असल्याने या घराण्याच्या अभ्यासात बराच गोंधळ उडतो. 
रावरंभाकडे पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर, 
माढा, करमाळा आणि भूमची जहागिरी होती. निजामाच्या १२ मुख्य जहागिरदारांत रावरंभाचे स्थान वरचे असल्याने हैदराबादमध्ये रावरंभाची स्वतंत्र देवडी (कचेरी) होती तर औरंगाबादमधील जुन्या हायकोर्टालगतच्या आजच्या कोटला कॉलनीत रावरंभा बाजीरावाची हवेली होती. 
रावरंभा घराण्यातील प्रत्येक पुरुष हा तलवार, कला, साहित्य, स्थापत्य यात रुची ठेवणारा होता. त्यापुढेच तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारासह, आतील ओव-या, माढा आणि करमाळ्यातील देवीची मंदिरे आदी त्यांच्या निर्मितीचे साक्षीदार आहेत. साखरखेर्डा, भालकी, फत्तेखेर्डा, राक्षसभुवन आणि उदगीर या लढाईतील रावरंभाचे योगदान विसरता येणार नाही. आज परंड्याच्या किल्ल्यावर दिसणारी तोफ जानोजी जसवंतराव रावरंभानेच पेडगावहून आणून बसविलेली आहे. महादजी शिंदे, बडोद्याचे फत्तेसिंग गायकवाड, सेनापती धनाजी जाधवांचे घराणे, कोल्हापूरचे छत्रपती, सरदार थोरात घराण्याशी रावरंभाचे वैवाहिक संबंध होते. 
रावरंभा निजामाकडे असले तरी त्यांचे पेशव्यांबरोबर चांगले संबंध होते. किंबहुना त्यांच्यासारख्या सरदारामुळेच निजामाला मराठ्यांविरोधात एकाही लढाईत विजय मिळाला नाही. मराठ्यांबरोबरच रावरंभाचे इंग्रज, फ्रेंच यांच्यासोबतही चांगले संबंध होते. एकदा तर रावरंभाने निजामाला सोडून जाण्याची भाषा करताच राजा असूनही डोळ्यात पाणी आणून निजामाला रावरंभाकडे विनंती करावी लागली. यावरून त्यांची योग्यता स्पष्ट होते. एकही लढाई न करता निजामाने मराठ्यांशी केवळ तह करून २०० वर्षे राज्यकारभार केला; परंतु प्रत्येक लढाईने रावरंभाची जहागिर कमी होत गेली.तरीपण तुळजापूर, माढा, करमाळा, रोपळे, शेंद्री, भूम येथील विविध इमारती रावरंभाच्या वैभवाची साक्ष देऊन उभ्या आहेत. 
पहिले रावरंभाचे वास्तव्य करमाळ्यात तर शेवटचे रावरंभा भूम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणी राहिले. त्यांना गोजराबाई व ताराबाई या दोन मुली असून ताराबाई पुढे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या रावरंभा घराण्याचे वंशज म्हणजे विजयसिंह थोरात हे असून ते भूमला राहतात. तर रावरंभाच्या भावाचे वंशज शेंद्री (ता. बार्शी) व रोपळे (ता. माढा, जि. उस्मानाबाद) येथे राहतात. तुळजाभवानीदेवीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सरदार निंबाळकर दरवाजा’ नाव दिले गेले तेही रावरंभावरूनच. अशा रीतीने सर्वच क्षेत्रांत नावाजलेल्या रावरंभाची कारकीर्द गाजली ती म्हणजे त्यांच्या कलासक्त स्वभावामुळे. 
रावरंभा निंबाळकरांमध्ये रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दुर हे एका नर्तकीच्या प्रकरणावरून फारच 
गाजले. हैदराबादच्या निजामाची राजवट म्हणजे निव्वळ नबाबशाही. त्यामुळे नाचगाण्याचा थयथयाट झाला. 
सातवा निजाम मीर उस्मान अली खानचे सहा विवाह झाले शिवाय इतर ४२ स्त्रिया जनानखान्यात होत्या. त्यातून त्याला ५० मुले व ४४ दासीपुत्र झाले. हे उदाहरण फार बोलके आहे. चमेली, बिजली, लैला यांसारख्या नर्तकी असायच्या. परंतु त्या कालखंडात हैदराबाद संस्थानात अतिशय प्रसिद्ध अशी नर्तकी आणि गायिका होती. तिचे नाव होते माहलिका ऊर्फ चंदा. तिच्या गाण्यावर निजाम, दिवाणापासून अनेक सरदार फिदा होते. परंतु माहलिकाची मर्जी होती ती रावरंभावर. 
माहलिकाची बिदागी ही सर्वसामान्याला परवडणारी नव्हती. माहलिकाकडे स्वतंत्र कोठी असून रावरंभाकडून तिला प्रतिमाह तीन हजारांची बिदागी मिळत होती. अप्रतिम लावण्य, गायन आणि नृत्यात पारंगत असणा-या माहलिकाकडे गडगंज संपत्ती होती. गुलाम हुसेनखानाने ‘तारिखे-गुल्जारे आसफिया’ नावाच्या ग्रंथात रावरंभा आणि माहलिकाचा वर्णिलेला किस्सा मनोरंजक आहे. 
१० फेब्रुवारी १७८२ ला पुण्यामध्ये सवाई माधवरावांचा शाही विवाह असल्याने देशभरातील राजा-महाराजांसह अनेक नामांकित लोकांनी हजेरी लावली होती. पूर्वी विवाह हे ३०-४० दिवस चालायचे. 
शाही विवाहामध्ये तर नाच-गाणे, विविध खेळ, मनोरंजनाबरोबरच विविध बाजार भरायचे. नाच-गाण्याकरिता तर देशभरातील सुप्रसिद्ध नर्तकींनी आपली हजेरी लावली होती. त्या वेळी खरं तर सर्वत्र व्यंकटनरसी नावाच्या नर्तकीचा बोलबाला होता. परंतु महालिकेने सर्वांना मागे टाकत पुणे गाजविले. साहजिकच सर्वत्र माहलिकाची चर्चा झाली. लग्नसमारंभानंतर वराती मंडळी बाजारहाट करण्याकरिता बाहेर पडली. 
मराठा कालखंडात बाजारात सर्वांत मोठी गर्दी ही घोड्याच्या बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसासह अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर 
स्थिरावली. अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच 
मोठे देखणे होते. नानामुळे तेथे मोठी गर्दी ही घोड्याच्या 
बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसांसह 
अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना 
सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर स्थिरावली. 
अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच मोठे देखणे 
होते. नानांमुळे तेथे मोठी गर्दी वाढली. थोड्याच वेळात घोड्याच्या खरेदीसाठी बोली लागली. शे- दोनशेचे घोडे पण नानांनी त्यावर दीड हजार लावले. अवास्तव किंमत आणि खुद्द नानांची बोली लागल्याने कोणीच पुढे आले नाही. बोली एकवार, दोनवार आणि तीनवार... व्हायच्या आत गर्दीतून आवाज आला दोन हजार रुपये.... सर्वांच्या नजरा आवाजाकडे वळल्या आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका नर्तकीने पेशव्यांना मागे टाकून २ हजाराने ६ घोडे घ्यावेत हे आश्चर्यकारकच होते. न राहून नाना स्वत: माहलिकेच्या जवळ आले आणि त्यांनी तिला प्रश्न केला, तुला कशाला हवेत घोडे? तेव्हा माहलिकेचे उत्तर ऐकून सर्वांचेच डोके सुन्न झाले, कारण माहलिका म्हणाली, हे सर्व घोडे मी माझ्या प्राणप्रिय रावरंभासाठी घेतले आहेत. 
पुढे माहलिका-रावरंभाचे संबंध अधिकच दृढ होत गेले. त्यामुळे तिच्यावर जळणा-यांनी अनेक कट-कारस्थाने रचून तिला देशद्रोही बनवून अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु निजामाने रावरंभाला जवळ बोलावून शहानिशा करून घेतली. रावरंभावर जिवापाड प्रेम करणा-या माहलिकेने रचलेल्या कविता पुढे प्रचंड गाजल्या. त्यातील काही पंक्ती किती बोलक्या आहेत. 
‘हरम को बनाये है बल दैर दिल में। 
तुझे जबसे हम अय सनम देखते है ।’ 
अशा या नामांकित माहलिकेने हैदराबाद या ठिकाणी इ.स. १८२४ साली रावरंभाचा आणि जगाचा निरोप घेतला. इकडे शंभर वर्षांहून अधिक काळ रावरंभा किताब मिळविणा-या या घराण्याचे दिवसही आता फिरले. इ.स. १८०० साली निजामाने इंग्रजांशी तह करून तैनाती फौज स्वीकारली. निजामाने दिवाणाला बडतर्फ करून सर्व संस्थानिक सरदार व जहागिरदारांना नाममात्र पगारीवर आणले. 
साहजिकच जड अंत:करणाने आपले आवडते शहर हैदराबादचा निरोप घेतला. खड्र्याच्या लढाईमुळे अगोदरच करमाळा त्यांच्या ताब्यातून गेल्याने भूम येथे छोटीशी जहागिरी राहिली होती. शेवटचे वास्तव्य त्यांचे तेथेच असून इ.स. १८५७ साली रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दर निंबाळकराने जगाचा निरोप घेतला. आज हैदराबादमध्ये माहलिकाची कबर तर भूम (जि. 
उस्मानाबाद) येथे रावरंभाची समाधी आहे. पराक्रमी माणसाची कलाआसक्ती आणि निजाम व पेशवेकालीन स्त्री-पुरुष संबंधावर हा प्रकाशझोत आहे. 
आजही माहलिकेचे प्रतीक म्हणून करमाळ्याच्या कमलादेवीच्या छबिन्यापुढे नाचण्याचा मान तिथल्या मूळ मुसलमान घराण्याकडे असून त्याकरिता इनाम जमीन आहे. निंबाळकर घराण्यात स्वकर्तृत्वाने पुढे आलेले रावरंभा हे एकमेव घराणे असूनही त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालीच नाही. परंतु आजही आपण करमाळा शहरात पाऊल ठेवलं की समोर त्यांनी बांधलेले कमलादेवीचे भव्य मंदिर दिसते आणि तोंडात या ओळी येतात- 
करमाळं शअर काई वाजत जाई जाई। 
तिथं नांदती अंबाबाई।। 
करमाळं शअर... रावरंभाचं वतयन 
महादेवाचा छबिना जातो मारोतीवरणं।। 
डॉ. सतीश कदम 
मोबा. ९४२२६ ५००४४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या