17-10-2015
वैश्विक पातळीवर स्त्रीशक्तीचा जागर कुठल्याना कुठल्या रूपात होत असतो. हिंदू राष्ट्रधर्माचा विचार केल्यास जगात ५१ शक्तिपीठे असून मराठी मुलखाचा विचार केल्यास देवी भागवत आणि दुर्गाकोशात महाराष्ट्रातील देवीच्या चार मुख्य ठाण्यांबाबत वर्णन सापडते. यालाच साडेतीन शक्तिपीठे म्हणतात. दुर्गाकोशात याचे वर्णन पुढील शब्दांत केलेले आहे-
कोल्हापूर महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता।
मातु:पुरंद्वितीयंच रेणुकाधिष्ठितं परम्।
तुळजापूरं तृतीय स्थान सप्तशृंग तथैवच।।
ओंकाराच्या रूपात या तीन स्थानांचा उल्लेख करतो तेव्हा त्यांची स्थाननिश्चिती म्हणजे ओंकारातील उ कार म्हणजे माहूरची रेणुका, आ कार म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, म कार म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तर वरचा अर्धचंद्र म्हणजे वनीची सप्तशृंगी होय. असे असले तरी महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी गावोगावी पूजा होते ती म्हणजे जगदंबेची. जगदंबा म्हणजे जगाची माता असून ती महिषमर्दिनी असल्याने दुष्टांचे निर्दालन करण्याकरिता ती सदैव पाठीशी असते, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे कुलदैवतही तीच आहे.साडेतीन शक्तिपीठांचा विचार केल्यास तुळजाभवानी तीर्थक्षेत्रातील प्रथा-परंपरा इतरांच्या मानाने निश्चितच वेगळ्या आहेत. त्यानुसार देवांचा विश्राम कालावधी धरल्यास उत्तर हिंदुस्थानात मुख्य मूर्तीसमोर पडदा टाकून प्रतिकात्मक स्वरूपात देव झोपला असे म्हटले जाते. परंतु श्री तुळजाभवानीच्या पीठाचा विचार केल्यास तुळजाभवानीचा स्वतंत्र निद्राकाल असून इतरत्र कुठेही न आढळणारी प्रथा तुळजापूरमध्ये आहे. ती म्हणजे वर्षभरात देवीचे तीन निद्राकाल असून या निद्राकालावधीत प्रत्यक्षात देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावरून काढून ती शयनकक्षातील पलंगावरील गादीवर शयन अवस्थेत ठेवलेली असते. मुख्य मूर्ती काढून परत ती सिंहासनारूढ करणे हे जिकिरीचे काम असून शेकडो वर्षांच्या परंपरेतून अखंडपणे सुरू आहे.
मुख्य मंदिरातील मेघडंबरीवर गंडकी शिळेतील शिल्पांकन केलेली पाषाणमूर्ती ही दुर्गेच्या रूपातील महिषमर्दिनी असून ती सिंहारूढ आहे. अष्टभुजा मूर्तीच्या पायाखाली महिषासुर असून मूर्तीच्या उजव्या अंगास मार्कंडेय ऋषी हात जोडून पुराण सांगताहेत तर डावीकडे सती अनुभूती उलखा अवस्थेत तपश्चर्या करतानाचे शिल्प आहे. देवीच्या मस्तकी सांभ असून देवीच्या उजव्या बाजूला सूर्य तर डावीकडे चंद्र आहे. ते चिरंतनाचे प्रतीक आहेत. मूर्तीवर चक्राकार कुंडले, केमूद, अंगद काकणे, कंठा, माला, मेखला आणि सारूळ्या कोरलेल्या आहेत.
तुळजाभवानीच्या मूर्तीचे अगदी वेगळे वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे तीन फूट उंचीची ही मूर्ती चलमूर्ती असल्याने ती अलगदपणे काढून पुन्हा बसविता येते. याकरिता देवी मूर्तीच्या खालच्या बाजूला गोलाकार कूस असून सिंहासनावरील गोल छिद्रामध्ये तो कूस शेपटाप्रमाणे अलगद जाऊन बसतो. आधार म्हणून देवीच्या पायाखालच्या दोन्ही बाजूंनी चिपा लावलेल्या आहेत. छिद्रामध्ये पाणी वगैरे काही जाऊ नये म्हणून शुद्ध मेणाने मूर्तीच्या पायाखालील बाजूला चबुतरा केला जातो. त्यासाठी १०१ मुठी मेण लागते. देवीच्या हातातील त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, पानपात्र व पाठीवर बाणांचा भाता असलेली मूर्ती प्रसन्न रूपात असून तिच्याकडे पाहताना दिव्यत्वाची प्रचीती येते. समर्थांनी याचे वर्णन पुढील शब्दांत केले आहे-
दु:ख दारिद्र उद्वेगे लोक सर्वत्र पीडिले।
मुळीची कुळदेव्या हे संकटी रक्षिते बळे।।
तुळजापुरीची माता प्रतापेचि प्रगटली।
आदिशक्ती महामाया कुळीची कुलस्वामिनी।।
कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात ही विश्रांतीने केली जाते. त्यामुळे मन आणि नाडी यांचा संयोग म्हणजे निद्रा होय. वर्षातून तीन वेळा श्री तुळजाभवानीचा निद्राकाल असतो. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद वद्य अमावास्या या दरम्यानच्या निद्रेला घोर निद्रा म्हणतात. धार्मिक अर्थाने महिषासुरासारखे अनेक असुर बेधुंदपणे स्वर्ग आणि पृथ्वीतलाचा नाश करण्याकरिता निघालेले असताना त्यांच्या निर्दालनाकरिता वैचारिक भूमिकेतून घेतलेली मनःशांती म्हणजे घोर निद्रा होय. त्यानुसार घटस्थापनेपूर्वी आठ दिवस अगोदर पारंपरिक रीतीरिवाजानुसार सिंहासनावरील मूळ मूर्ती काढून बाजूला असणा-या शयनकक्षात म्हणजे पलंगावर निद्रित अवस्थेत ठेवली जाते. ज्याला स्थानिक भाषेत देवी झोपली म्हणतात. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पहाटेच्या समयी मूर्ती शयनकक्षातून गाभा-यातील सिंहासनावर स्थापित केली जाते. घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरुवात झालेली असते. नवरात्र म्हणजे देवीचे विविध असुरांशी चाललेले युद्ध होय.नऊ दिवसांतील युद्धात विविध पातळींवरील युद्धात विजय मिळवून श्रमपरिहारातून देवीची निद्रा सुरू होते. ती म्हणजे आश्विन शुद्ध एकादशी ते आश्विन शुद्ध पौर्णिमा. या पाच दिवसांच्या निद्रेला श्रमनिद्रा म्हणतात. असुराचे पारिपत्य होऊन सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आता विविध कामांत गुंतवून घेतल्याचे कौतुक करत विजयी पताका मिरविणे म्हणजे काठ्यांची मिरवणूक होय. याकरिता सोलापूर शहरातील लाड तेली समाजातील मानाच्या काठ्या तुळजापूरमध्ये येऊन वाजतगाजत त्या देवीच्या प्रांगणात दाखल होतात. रात्रीच्या वेळी छबिना निघून शेवटी पानेरी मठाचे महंत जे रोज देवीची सेवा करतात, त्यांच्या मानाच्या जोगवा मागण्याने नवरात्रीची सांगता होते. शेवटी मानव हा याचक आहे हे यातून निर्देशित होते.
सर्वसामान्यपणे आपणाला देवीचा एकच नवरात्र उत्सव माहीत आहे, तो म्हणजे शारदीय नवरात्र. वरच्या बाजूला याचे वर्णन आलेले आहे. शारदीय नवरात्रीत येणा-या भक्तांना मनोभावे पूजाविधी करता यावा यासाठी येथील प्रत्येक जातीतील पुजारी काम करत असतो. परंतु स्वत:चे विधी तसेच राहतात. त्यामुळे थोडेसे निवांत झाल्यावर पौष महिन्यात शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरा होतो. तत्पूर्वी पौष शुद्ध प्रतिपदेपासून ते अष्टमीपर्यंत आठवडाभरासाठी देवीचा निद्राकाल असतो. या निद्रेला भोगनिद्रा म्हटले जाते. शाक म्हणजे भाजी. दोन दिवसांत उगवणा-या गवतापासून विविध फळांपर्यंत प्रत्येक प्राणिमात्राची सोय करणारी आदिमाया असल्याने यादरम्यान भाज्यांचा भोग चढविला जातो. तुळजाभवानीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला कितीही सोन्याने मढविले तरी तिचा पहिला नैवेद्य हा भाजी-भाकरीचा असतो. म्हणूनच संतांनी म्हटले आहे-
देखिला तुळजामाता। निवालो अंतरी सुखे।
तुटली सर्वहि चिंता। थोर आधार वाटला।।
आघात संकट वारी। निवारी दुष्ट दुर्जन।
संकटी भर्वसा मोठा। तात्काळ काम होतसे।।
अशारीतीने साडेतीन शक्तिपीठांतील महोत्सवाची वेळ सारखीच असली तरी पूजाविधीच्या प्रकारात फार फरक आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे मूळ मूर्ती काढून ती अन्य ठिकाणी हलवून पलंगावर निद्रिस्त अवस्थेत ठेवली जाते. अशाप्रकारचे उदाहरण अन्यत्र आढळून येत नाही. नाही तरी तुळजाभवानीचा महिमा अगाध आहे. धार्मिक दृष्टीबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनातून निद्राकाळाचा विचार केला असता मंदिर परिसराची स्वच्छता हा एक भाग त्यामागे असू शकतो. याशिवाय तुळजापूर हे हैदराबाद, विजापूर, औरंगाबाद व अहमदनगरच्या मध्यभागी असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही मूळ मूर्ती शत्रुपक्षाच्या हल्ल्यातून वाचविण्याकरिता मूर्तीची रचना तशी केलेली असावी. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती म्हणजे त्वरिता. ‘त्वरिता’ वरूनच तुरजा म्हणजे तुळजा हे नामकरण झालेले आहे. शिवरायांच्या भोसले कुळापासून ते सर्वसामान्यां पर्यंत सर्वजणांनी देवीची सेवा बजावली आहे. त्यामुळे तिची ध्यानमग्न अवस्था ही भक्ताच्या कल्याणार्थ प्रेरित करणारी असते.
डॉ. सतीश कदममोबा. ९४२२६ ५००४४
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.