बापाच्या साम्राज्यासाठी पोरींचे बलिदान

सप्तरंग|  Nov 21, 2015|  0|  16|
0  0 0 0    
गतकाळात होऊन गेलेल्या घटनांचे जेव्हा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करतो तेव्हा आपणास आपले स्थान निश्चित करता येऊ शकते. रोजच्या जीवनात आपण अगदी किरकोळ कारणासाठी स्वत:ला हरवून बसतो. पण इतिहासातील अनेक अशा घटना पाहिल्यास मन पिळून निघते. परंतु त्याकरिता तुम्हाला मनाने त्या कालखंडात जावे लागते. १३ व्या शतकात दक्षिण भारतात देवगिरीचे यादव आणि हम्पीचे विजयनगर साम्राज्य हे भारतातच नाही तर अखिल विश्वातील एक बलशाली सत्ता म्हणून पुढे आले होते. सोन्याचा धूर निघत होता म्हणतात तो याच सत्तेत. राजाला बसायला सोन्याची पालखी आणि हत्तीला दूध पिता यावे म्हणून दुधाचे हौद बांधलेले होते. यावरून इथल्या वैभवाची साक्ष पटते. दृष्ट नेहमी चांगल्या गोष्टीलाच लागत असते. त्यानुसार संपूर्ण दक्षिण भारत व्यापून टाकलेल्या या बलशाली सत्तेवर मुस्लिम आक्रमणाचा हातोडा पडला आणि त्यातून त्यांचे बुरूज तर ढासळलेच परंतु त्याही पुढे जाऊन सत्तेच्या सारीपाटात या साम्राटांच्या मुलींना आपल्या भावनेचे बलिदान द्यावे लागले. चौदाव्या शतकात संपूर्ण दक्षिण भारतात अंमल असणा-या विजयनगर साम्राज्याची सत्ता बेळगावपासून कन्याकुमारी ते कटकपर्यंत पसरली होती. परंतु तत्पूर्वी महाराष्ट्रातील देवगिरीचे भारत हे आपल्या हेमाडपंथी बांधकामशैलीने आजही जनमानसात घर करून आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मार्डी या ठिकाणी सापडलेल्या शिलालेखावरून यादव घराण्याच्या सत्तेचा खरा संस्थापक म्हणून भिल्लम यादवचे नाव पुढे येते. पुढे औरंगाबादजवळील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण बनले. याच घराण्यात सिंघण, कृष्णदेवराय, रामदेवरायसारख्या राजांनी अनेक महत्त्वपूर्ण पराक्रम करत सर्वत्र आपले नाव केले. देवगिरीचा किल्ला म्हणजे रायगडाची जणू प्रतिकृती होती तर तुळजाभवानीसारख्या अनेक नामांकित मंदिराची उभारणी ही याच घराण्यातील राजांनी केली. प्रधान हेमाद्री पंताप्रमाणेच पुरुषोत्तम, श्रीधर, राघव यासारखे अनेक गुणवान मंत्री या घराण्याची मान उंचावणारे होते. कृष्णदेवरायाने देवगिरीच्या साम्राज्याला उंचीवर नेले; परंतु पुढे रामदेवरायाच्या कारकीर्दीत दिल्लीच्या सुलतानाने केलेल्या आक्रमणामुळे यादवांच्या सत्तेचे कंबरडेच मोडले. 
गोवा, दाभोळ, पैठण, देवगिरी इत्यादी ठिकाणांहून थेट परदेशी व्यापार चालणा-या यादवांवर अल्लाउद्दिन खिलजीची नजर पडली. इ.स. १२९६ ला अल्लाउद्दिन खिलजीने अत्यंत वेगवान हालचाल करत देवगिरीकडे कूच केली. रामदेवरायचा मुलगा शंकरदेव हा होमसाळ राजांशी लढण्याकरिता बाहेरगावी होता. अल्लाउद्दिनने एलिचपूर, पैठण, लासूर याप्रमाणे देवगिरीकडे प्रयाण करताना त्याच्यासोबत ८००० सैनिक होते. लासूर येथे यादवांचा एक अधिकारी कान्हा याने सुलतानी फौजेचा प्रतिकार केला. आफताबी, अमिर खुस्रो यासारख्या इतिहासकारांनी लासूरच्या प्रतिकाराचे वर्णन केले आहे. त्यानुसार कान्हासोबत दोन स्त्रिया वाघिणीसारख्या लढल्या. शत्रूच्या फौजेला त्यांनी सळो की पळो करून सोडले. त्यानुसार शत्रूच्या शिपायाला त्या अलगदपणे उचलून हवेत फिरवून दूर फेकून देत होत्या. यावरून देवगिरीच्या यादवांच्या सत्तेचा अंदाज येतो. त्याही अवस्थेत कान्हाने देवगिरीवर बाजूच्या हल्ल्याची खबर पोहोचवून वाघिणीसह बलिदान स्वीकारले. 
देवगिरीसारख्या मजबूत किल्ल्यामुळे रामदेवराय काहीसा काफिल राहिला. सुलतानी सेनेने जेव्हा देवगिरीत प्रवेश केला तेव्हा त्याला प्रत्येक घरात हिरे-माणकांच्या राशी, सोने-चांदीचे ढीग, उंची वस्त्रे व अत्तराचा घमघमाट दिसला. शत्रूचे आगमन होत आहे हे दिसताच धान्याच्या राशी भरून ठेवण्याच्या आज्ञा दिल्या. शत्रूने किल्ल्याला वेढा घातल्यानंतर रामदेवाच्या लक्षात आले की, भरून ठेवलेल्या गोण्यांत धान्य नसून मीठ आहे. त्यामुळे सैन्याची उपासमार होऊ लागली. साहजिकच रामदेवरायाने खिलजीसोबत जाचक तह स्वीकारला. यामध्ये सहाशे मण सोने, सात मण पोवळे, दोन मण हिरे, माणिक, मोती, हजार मण चांदी, चार हजार रेश्मी कपड्यांचे नग यांचा समावेश होता. पंचवीस दिवस चाललेल्या या मोहिमेतील सर्वांत दुर्दैवी बाब म्हणजे वयस्कर खिलजीसोबत रामदेवरायाची सुंदर राजकन्या जिताई हिचा निकाह लावण्यात आला. दुर्दैवाची बाब म्हणजे रामदेवरायाने सुलतानाचे मांडलिकत्व स्वीकारले. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जावई हरपादेवाने विरोध करताच खिलजीचा वारसदार कुतबुद्दिन मुबारक शाहने त्याला पूर्ण सोलून काढून देवगिरीच्या वेशीवर लटकवले. अशा रीतीने १३१७ पासून १९४७ पर्यंत या परिसरावर मुस्लिम अंमल कायम राहिला. 
कर्नाटकातील होस्पेट तालुक्यातील व बेल्लारी जिल्हास्थित तुंगभद्रा नदीकाठी असणारे हम्पीचे विजयनगर साम्राज्य म्हणजे १४ व्या शतकातील जणू स्वप्ननगरीच. देवगिरीनंतर खिलजीने या साम्राज्यावरही वरवंटा फिरवून तेथील राजघराण्याला धर्मांतरित केले. परंतु मनाचा खंबिरपणा दाखवत इ.स. १३३६ साली हरिहर आणि बुक्क या दोघांनी पुन्हा एकदा आपल्या साम्राज्याचा पाया घातला. तेच पुढे विजयनगर साम्राज्य म्हणून प्रसिद्धीस पावले. कर्नाटकपासून ते कन्याकुमारीपर्यंत या साम्राज्याचा विस्तार असून २२५ वर्षे टिकलेल्या विजयनगरवर संगम, साळुव, तुळुव, आरविडू या घराण्यांची सत्ता राहिली. यादरम्यान हरिहर, बुक्क, सदाशिवराय, रामदेवराय, देवराय यासारख्या राजांनी विजयनगरला वैभवाच्या शिखरावर नेले. वेंकटद्री व तिरुमलादेवासारखे सेनापती विजयनगरचेच. 
आजही आपण हम्पीला गेलो तर त्यांच्या वैभवाच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसतात. १६६ चौ. कि. मी. वर पसरलेले हम्पीचे क्षेत्रफळ हे संपूर्ण रोमन साम्राज्याएवढे होते. शहराभोवती सात तटांनी संरक्षणव्यवस्था मजबूत करण्यात आलेली होती. तुंगभद्रा नदीवरून कालवा खोदून पाणी थेट राजधानीत आणण्यात आलेले होते. सैनिकांच्या भोजनाकरिता डायनिंग टेबल व दगडात कोरलेल्या भोजनाच्या थाळ्या पाहून थक्क होते. राजांच्या स्नानाकरिता १०-२० एकरावर बांधलेले भव्य स्नानगृह, रंगपंचमी व इतर उत्सव पाहता यावेत म्हणून बांधलेले सातमजली लाकडी इमारतीचे जोते पाहण्यास मिळतात. जगाच्या पातळीवर प्रसिद्धीस पावलेल्या संपूर्ण दगडात कोरलेला रथ पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. पंढरपूरच्या पांडुरंगाची मूळ मूर्ती याच हम्पीतल्या विठ्ठल मंदिरातून इकडे आणल्याचे सांगितले जाते. आज हम्पीत विठ्ठलाचे भव्य मंदिर असून मंदिरातील दगडी खांबावर हाताने जोराने मारल्यास सारेगमपाचा नाद घुमतो, झरोक्याच्या सूर्यकिरणावर आपला हात धरल्यास पलीकडे सावलीत हात उलटा दिसतो. इथल्या जागतिक बाजारपेठेचे आता फक्त दगडी खांब शिल्लक असून त्या वेळी सोने, चांदी, हिरे, घोडे अशा प्रत्येक बाबीसाठी वेगळी दुकाने नव्हे तर बाजारपेठ होती. ६.७० मीटर उंचीची नृसिंहाची मूर्ती तर जणू एक आश्चर्यच होते. राजाला बसायला सोन्याची पालखी होती तर मानाचे हत्ती बांधण्याकरिता भव्य हत्तीखाने असून त्यांना दूध पिता यावे म्हणून बांधलेले दगडी हौद आजही तेथे आहेत. हिंदू धर्माची बूज राखत सर्व सण-समारंभ अगदी मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा विजयनगरने सांभाळली होती. एकंदरच या साम्राज्याची ख्याती जगभर पसरलेली होती. 
फ्रेंच, पोर्तुगाल, इंग्लंड, रोम, चीन यांसारख्या देशांशी विजयनगरचा थेट व्यापार चालत होता. हिंदुस्थानातील ऐश्वर्यसंपन्न साम्राज्याला दृष्ट लावण्याचे काम अफगाणिस्तानातील उपद्रवी टोळ्यांनी केले. इ.स. १३१८ ला देवगिरीची सत्ता बुडविल्यानंतर दक्षिण हिंदुस्थानात बहामनी सत्तेच्या रूपाने इस्लामी राजवटीला सुरुवात झाली. हरिहर आणि बुक्क यांच्यानंतर इ.स. १४०६ ला राजा देवरायाने विजयनगरची गादी सांभाळली. इ.स. १४०७ ला बहामनी सुलतान ताजुद्दिन फिरोजशहाची नजर आता विजयनगर साम्राज्यावर पडल्याने प्रचंड फौजेसह त्याने विजयनगरला वेढा घातला. पृथ्वीराज चौहानच्या पराभवापासून हिंदुस्थानातील राजांनी कुठलाही धडा घेतलेला नव्हता. देवरायाने गुजरात, माळवा, खानदेश यासारख्या हिंदू राज्यांकडे मदत मागितली; परंतु कुणीही मदत न केल्याने एवढ्या बलशाली सत्तेपुढे हजारो कि.मी.वरून आलेल्या मुस्लिम टोळ्यांनी विजयनगर साम्राज्याची कोंडी केली. शेवटी देवरायाने फिरोजपुढे शरणागती पत्करली. विजयनगरने बहामनी सुलतानापुढे लोटांगण घालत जाचक तह स्वीकारला. 
या तहानुसार देवरायाने सुलतानाला १० लाख होन नजराणा, ५ मण मोती, ५० हत्ती व २००० कलाकार भेट म्हणून देण्यात आले. यातही आणखी अटीनुसार देवरायाने आपल्या लाडक्या मुलीचा निकाह बहामनी सुलतान फिरोजशी लावून दिला. हीच अवस्था गुजरातच्या कर्णसिंह वाघेलाच्या कमलादेवी आणि खेडल्याचा राजा नरसिंगाच्या मुलीच्या बाबतीत घडली होती. 
हातभर मिशांना मोठ्या तो-यात पीळ मारणारे हे थोर राजे आणि त्यांचे वैभवशाली साम्राज्य अशा काळ्याकुट्ट घटनांनी बरबटलेले आहे. याचाही इतिहास समोर 
आला पाहिजे. शरमेची गोष्ट म्हणजे या राजांनी आपल्या कोवळ्या पोरींना सुलतानाच्या जनानखान्यात पाठवून त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. म्हणूनच कदाचित हम्पीचे वैभवशाली विजयनगर साम्राज्य राजकन्येच्या अंधारमय मनावर उभे असून ते पाहण्यापेक्षा आपणच डोळे मिटलेले बरे! असे आमच्या कन्येला वाटले तर नसेल ना? कारण शेवटचा श्वास तिने हम्पीजवळच घेतला. 
डॉ. सतीश कदम 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या