चुंडावत मांगी सैनानी सर काट दे दियो क्षत्रानी

चुंडावत मांगी सैनानी सर काट दे दियो क्षत्रानी

राजस्थान म्हणजे राजांचे वसतिस्थान. ज्या भागात मेवाड, भरतपूर, अमेर, बुंदी, मारवाड, कोटा, अल्वर, बिकानेर, जोधपूर अशा अ‍ेक छोट्या-मोठ्या राजांनी समृद्ध केलेला देश. राजस्थानची सीमारेखा पाकिस्तानलगत असल्याने काबूल, कंदहारकडून होणारी सुलतानी आक्रमणे या भागाने झेलली. अमेर (जयपूर)सारख्या राजांनी त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार करून आपली गादी गुलाबी करून घेतली तर याच वेळी महाराणा प्रतापसारख्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मोगलांशी टक्कर देत आपले साम्राज्य टिकवून ठेवले. तिथल्या मातीवरून जयपूरला गुलाबी तर उदयपूरला शुभ्र सिटी म्हटले जाते. एका कवीने राणाप्रतापांवर केलेली कविता किती बोलकी आहे. 
                    ‘राणाप्रतापकी खुद्दारी भारतमाता की पुंजी है। 
                    ये वो धरती है, जहाँ कभी चेतक की टापे गुंजी है।’ 
राजस्थानमधील ३३ जिल्ह्यांपैकी उदयपूर एक जिल्हा असून अरवली पर्वतरांगांमध्ये रजपुतांनी स्थापन केलेल्या साम्राज्याला मेवाडचे साम्राज्य म्हटले जाते. गहलोत आणि सिसोदिया वंशांनी यावर राज्य केले. चित्तोड ही साम्राज्याची राजधानी असून बप्पा रावल, राणा संग, महाराणा प्रताप, दुर्गादास राठोड, राणी पद्मिनी याच मातीतील माणसं. पुढे १५५९ साली सिसोदिया वंशीय महाराणा उदयसिंगाने उदयपूर नगरीची स्थापना करून आपली राजधानी तेथे हलविली. छत्रपती शिवरायांचे मूळ सांगितले जाते ते याच घराण्यातील, त्यामुळे समृद्धी, परंपरा आणि शौर्याच्या बाबतीत मेवाडची ओळख वेगळी आहे. 
दिल्लीच्या गादीवर जेव्हा मोगल सम्राट राज्य करत होते त्याच वेळी मेवाडच्या गादीवर राजसिंह प्रथम (१६५२-१६८०) हा राजा असून आपल्या पूर्वजांनी चालविलेली परंपरा त्याने पुढे सुरू ठेवत जीवनात एकही लढाई कधी हरला नाही. औरंगजेबाच्या जाचक धोरणाविरोधात दक्षिणेत छत्रपती शिवाजी, बुंदेलखंडात राजा छत्रसाल, पंजाबमध्ये गुरु गोविंदसिंग तर मारवाडमध्ये राजसिंहांच्या नेतृत्वाखाली दुर्गादास राठौर लढत होते. मोगल सम्राट अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत सर्वांचे मेवाडप्रती विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. साहजिकच राजा जयसिंगाने औरंगजेबाचे मांडलिकत्व स्वीकारायला नकार दिला. राजस्थानातील अनेक रजपुतांनी मोगलांची चाकरी पत्करली तरी मेवाड अजून विचलित झाले नव्हते. 
मराठ्यांचा इतिहास ज्याप्रमाणे ग्रँड डफने लिहिला त्याप्रमाणे राजस्थानमध्ये कित्येक वर्षे घोड्यावर फिरून जेम्स टॉड नावाच्या इंग्रजाने रपपरश्री रपव रपींर्ळीिंळींळशी ेष ीरक्षीींहरप नावाचे पुस्तक लिहिले. त्यानुसार मेवाड साम्राज्यात एकंदर १६ मुख्य जहागिरी असून त्यात सलुंबर जहागिरीची स्थापना मेवाडचा महाराणा लखासिंहाचा मोठा मुलगा रावत चुंडासिंहने केली होती. उदयपूरपासून ७० कि.मी. दूर सलुंबर हे तालुक्याचे ठिकाण असून येथेच मोठा इतिहास घडला होता. औरंगजेबाने सत्तेवर येताच उत्तर भारतातील एक एक सत्ता काबिज करायला सुरुवात केली होती. याशिवाय जिझिया नावाचा कर लागू केला होता. याचा विरोध छत्रपती शिवरायांपासून मेवाडच्या राज सिंहापर्यंत चालूच होता. 
मेवाड म्हणजे उदयपूरच्या गादीवर राजसिंह हा कारभार करत असताना सलुंबरच्या जहागिरीवर रावजी रतनसिंहजी चुंडावत हा तरुण कार्यरत असून रतनसिंहाचा विवाह बुंदीच्या हाडा राजाची कन्या सरोजकुंवर ऊर्फ इंद्रकुंवरशी झालेला होता. सरोजकुंवरच पुढे आपल्या अनोख्या कर्तृत्वामुळे हाडा राणी म्हणून प्रसिद्धीस पावली. ही हाडाराणी म्हणजे जोधपूरचा राजा जसवंतसिंहाच्या पत्नीची भाची होती. 
रजपूत म्हणजे राजाचा पुत्र. विशेषकरून राजस्थानच्या वाळवंटात राहून यांनी परकीय आक्रमणे झेलल्यामुळे दक्षिण भारत काही अंशी मजबूत ठेवण्यास मदत केली. रजपूत आणि मराठे तसे दोन्ही लढवय्ये मानले जात असले तरी रजपूत समोरासमोर युद्ध करून मरणे पसंत करतो परंतु त्याच वेळी मराठा युद्धातून अचानक माघार घेऊन शत्रूला दुस-याच पद्धतीने कसा बेजार करील सांगता येत नाही. ज्याला गनिमी कावा म्हटलेले आहे. बहुपत्नीत्वाबरोबरच अनेक स्त्रिया आपल्या पदरी ठेवण्याची पद्धत रजपूत राजांकडे होती. त्यांना पासवान, पडदायन अशा पदव्या दिल्या जायच्या. रजपुताच्या अनेक वीरांनी ज्याप्रमाणे रणांगण गाजविले त्याच वेळी त्यांच्या स्त्रियांनी जोहारसारखे बलिदान देऊन आपणही रजपुताईन आहोत हे दाखवून दिले. हाडा राणीचे बलिदान म्हणजे जगाच्या इतिहासातील एक अनोखी कहाणी ठरली आहे. कवी मेघराजनी पुढील शब्दांत हाडाराणीचे कौतुक केले आहे- 
‘सरदार विजय पाई रण में, सारी जगत बोली जय होŸ। रणराणी हाडीराणी री मा भारती री...’ 
औरंगजेबाला विरोध केल्यामुळे त्याने ७०-८० हजार सैन्यासह उदयपूरवर आक्रमण केले. उदयपूरचे शासक कुठल्याही आक्रमणाला घाबरत नसल्यामुळे महाराणा राजसिंहाने युद्धाची जोरदार तयारी सुरू केली. औरंगजेबाचा एक बंडखोर मुलगा अकबराने बापाविरोधात मोहीम उघडण्यासाठी राजपुताण्यात जाऊन दुर्गादास राठोडचे साहाय्य घेतले होते. दुर्गादास म्हणजे मेवाडच्या गादीचा सेवक असला तरी कर्तृत्वाने त्याने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. साहजिकच मोगली फौजेचा प्रतिकार करण्यासाठी राजसिंहाने सैन्याचे तीन भाग करत मोठा मुलगा जयसिंहाला अरवली पर्वताकडे, भीमसिंहाला पश्चिमेकडून होणा-या आक्रमणाची जबाबदारी दिली होती. राजसिंह स्वत: दुर्गादास व अकबरासह औरंगजेबाला सामोरा गेला. 
मेवाडवर आणीबाणीची वेळ आलेली असतानाच सलुंबरचा रावजी रतनसिंह हा हाडीराणीसोबत लग्न होऊन जेमतेम सात दिवस झाल्यामुळे संसारसुखामध्ये आनंदी होता. सूर्याेदयाची वेळ असल्याने हाडीराणी राणाला उठविण्याकरिता गेली असता राणाही आपल्याच मूडमध्ये तिला बोलायला लागला. तेव्हा राणीने सांगितले, कुंवरसाहेब, यावेळी मी येथे निरोप देण्यासाठी आले आहे. त्यानुसार शार्दुल नावाचा दूत मेवाडच्या राजाचा संदेश घेऊन सालुंबरला आलेला होता. रतनसिंहाने मेवाड सम्राटाचा संदेश वाचला. त्यात त्याने लिहिले होते, मी मोगलांच्या वेढ्यामध्ये अडकलेलो असून त्याला आम्ही समर्थ आहोत. तरी परंतु मोगलांची ज्यादा कुमक दिल्लीहून येत असूून ती रोखण्याची जबाबदारी आपणावर सोपवित आहे. मला खात्री आहे हे काम तू यशस्वीपणे पार पाडशील. 
कर्तव्यतत्पर रतनसिंहाने लागलीच तयार होऊन आपला केशरी रंगाचा युद्धपोशाख चढविला. निरोप घेण्याकरिता म्हणून तो पत्नी हाडीराणीकडे आला. तेव्हा मात्र पत्नीकडे पाहून त्याचे मन घायाळ झाले. पुरुषाच्या मनातील भावना त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे स्त्रीला जाणवतात. मोठ्या व्याकुळतेने त्याने पत्नीचा निरोप घेतला. नवविवाहित रतनसिंहला पत्नीच्या विरहाने व्याकुळ केले होते. त्यामुळे त्याचे मन विचलित व्हायला लागले. तरीपण पत्नीची एखादी निशाणी आठवण म्हणून राहावी म्हणून त्याने दूतामार्फत विनंती केली. 
हाडीराणी हीसुद्धा पराक्रमी घराण्याची रजपूत कन्या व जसवंतसिंहाच्या महाराणीची भाची असल्याने रजपुतांच्या पराक्रमी पुरुषांची गाथा तिच्या मनात होती. अशाच एका युद्धातून माघार घेऊन जसवंतसिंह परत घरी आल्यानंतर त्याचे तोंड पाहण्यास नकार दिला, शिवाय चांदीच्या ताटाऐवजी नव-याला लाकडाच्या ताटात जेवण वाढले. त्याचे कारण सांगताना तिने म्हटले, तुमच्यासारख्या युद्ध हरलेल्या माणसाला धातूच्या भांड्यात जेवण वाढल्यास त्याचा आवाज ऐकून तुम्हाला तलवारीचा भास होईल व जेवण-पाणी जाणार नाही. हा रजपुताचा अपमान होता तर समस्त रजपूत स्त्रियांसाठी तो एक संदेश होता. 
मानी स्वभावाच्या हाडीने आपला धर्म निभावत नव-याला आपली निशाणी (रजपुतात त्याला सैनानी म्हणतात) पाठविण्याची तयारी केली. एक पत्र लिहून त्यात म्हटले, मी आपणाला अनमोल सैनानी पाठवत असून ती घेऊन आपण जराही विचलित न होता रजपुताप्रमाणे युद्धामध्ये पराक्रम गाजवावा. मोठ्या धाडसी राणीने आपले मस्तक कापून निशाणी म्हणून नव-याला पाठविले. दूताने राणीची निशाणी व पत्र रतनसिंहाकडे सुपुर्द करताच तो व्याकुळ झाला. पत्नीचे शीर गळ्यात अडकवून शत्रूवर तुटून पडून त्याने मेवाड साम्राज्य वाचविले. उलट औरंगजेबाची पत्नी उदयपुरी बेगम राजसिंहाच्या तावडीत सापडल्याने मानहानीकारक तह स्वीकारत पुन्हा कधीही त्याने मेवाडकडे पाहिले नाही. रजपुतांत पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या स्त्रियांचा इतिहासही रोमहर्षक आहे. उदयपूरपासून जवळच असणा-या सलुंबरमध्ये गेल्यास रतनसिंहाच्या हातामध्ये हाडीराणीचे शीर असलेला पुतळा पाहिल्यास राणीची निशाणी घेऊन आल्यानंतर त्याच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द मनावर घाव करून जातात. ते शब्द 
होते- 
‘मैने मांगी सैनानी 
सर काट दे दियो क्षत्रानी।’ 
डॉ. सतीश कदम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या