mahadaji shinde


मराठा सरदारांनी असे का केले?

मराठी साम्राज्य बुडवायला निघालेला औरंगजेब सलग २६ वर्षे या मुलुखात राहिल्यामुळे मराठ्यांची तलवार तळपली असली तरी त्यांना काही मर्यादा पडल्या होत्या. १७०७ ला औरंगजेबाचे निधन झाल्याने मोगलांच्या कैदेत असणा-या शाहुराजांची सुटका झाली. दुस-या बाजूला मराठ्यांचे शत्रू दुर्बल झाल्याने त्यांनी अटकेपार झेंडा रोवला. छत्रपती शाहू राजांचे सर्वसमावेशक धोरण राहिल्याने पेशवेतर वाढलेच परंतु त्यासोबत शिंदे, होळकर, पवार, भोसले यासारख्या सरदारांचे सवते सुभे उभे राहिले. इतिहासात नेहमी लढाया, तह, खून राजा, राणी यासारख्या बाबींवर चर्चा होत असते. त्यापलीकडे जाऊन सामाजिक जीवनाचा अभ्यास केल्यानंतर एवढे मोठे सरदार असे का वागले असतील, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून पेशवाईला सुरुवात झाली. त्यानुसार पहिल्या बाजीरावांनंतर बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर पेशवाई गाजविली. छत्रपती शाहूंच्या पादुका देव्हा-यात ठेवून त्यांची पूजा करण्याची पद्धत नानासाहेबांनी सुरू केली. त्यामुळे मराठी साम्राज्यात नानासाहेबांचे वजन वाढले. त्यामुळे बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले यासारख्या सरदारांनी वेगळी भूमिका घेताच त्यांचे बंड मोडून नानासाहेबांनी चांगलाच वचक बसविला. भालकी, उदगीरच्या युद्धात निजामावर विजय मिळवून मराठवाड्यातील बराचसा भाग स्वराज्यात सामावून घेतला. त्यांच्यामुळेच शिवनेरी, नळदुर्ग, अहमदनगर, देवगिरी यासारखे किल्ले स्वराज्यात दाखल झाले. साहजिकच त्यामुळेच यादवानंतर ४०० वर्षांनंतर तुळजाभवानीचे ठाणे मराठ्यांच्या आधिपत्याखाली आले. म्हणूनच या कालखंडात मराठ्यांच्या अनेक सरदारांनी तुळजाभवानीची वारी केली आहे.
नानासाहेब पेशवे कलमबहाद्दर असल्याने त्यांच्या कामात शिस्त आणि मुत्सद्देगिरी होती. एका बाजूला छत्रपतींशी एकनिष्ठता तर दुस-या बाजूला मराठ्यांचे एक- एक सरदार संपविण्याचे धोरण त्यांनी आखले. म्हणूनच सागर किना-याचे रक्षण करणा-या आंग्रेच्या विरोधात इंग्रजांच्या मदतीने मोहीम आखून मराठ्यांचे आरमार संपविले. पानिपत युद्धानंतर गायकवाड, शिंदे, होळकरांच्या जहागिरी जप्त केल्या. दिल्लीच्या बादशहाला मदत केली म्हणून नागपूरकर भोसले कायम स्वराज्याविरोधात भूमिका घेऊ लागले. पुण्यातील पर्वती, नाशिकजवळील त्र्यंबकेश्वराचे मंदिर यासारख्या वास्तू त्यांच्याच काळात उभ्या राहिल्या. नानांच्या काळातील सर्वांत मोठी हालचाल म्हणजे मराठ्यांनी लावलेला अटकेपार झेंडा तसेच पानिपतचे युद्ध.
पानिपत युद्धात विजय मिळावा म्हणून नानासाहेबांनी तुळजाभवानीला नगा-याचा नवस करून फेडला. खरं तर १७६० ला अहमदशहा अब्दालीची हिंदुस्थानवरील स्वारी म्हणजे फार मोठे संकट होते. मोगलांच्या प्रदेशातून चौथाई आणि सरदेशमुखी वसुली करण्याच्या बदल्यात दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर येऊन पडल्याने नानांचे भाऊ सदाशिवराव व चिरंजीव विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली एक लाखाची फौज घेऊन मराठ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले. बाबर, चंगीजखान, नादिरशहा यांच्या आक्रमणाची झळ सा-या हिंदुस्थानने पाहिली होती. तर १७६० साली अब्दालीची स्वारी म्हणजे भारतावरील स्वारी भयानकच होती.
अब्दालीला अडविण्याची ताकद फक्त मराठ्यांतच होती. या संकटामुळे संपूर्ण देश हादरलेला असतानाच तिकडे पानिपतावर मराठ्यांचे हाल सुरू झाले. सैन्याची उपासमार सुरू झाली. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणत बुरांडी घाटावर दत्ताजी शिंदेंनी आपल्या प्राणाची बाजी लावली. अब्दाली व मराठ्यांच्या फौजा यमुनातीरावर एकमेकांसमोर उभा राहिल्या. रसद तुटल्याने सदाशिवभाऊंना देवघरातील देवही मोडावे लागले होते. १७६१ चा कालखंड. संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपलेला होता. संपूर्ण देश या महाभयानक युद्धाच्या परिणामाने अगोदरच चिंतित झालेला होता.
पानिपतच्या वेळी गादीवर असणा-या रामराजांनी नानासाहेबांच्या हाती कारभार सोपविल्याने संपूर्ण भिस्त पेशवे नात्याने त्यांच्यावरच होती. अब्दालीच्या आक्रमणाची चाहूल नानालापण लागली होती. परंतु तशाही अवस्थेत चाळीशीतल्या नानाला दुस-या लग्नाचा मोह झाला. नवरीची शोधाशोध सुरू झाली तेव्हा त्यांना पैठणच्या नारायणराव वाखरेंची कन्या पसंत पडून हिरपूड या ठिकाणी विवाह संपन्न झाला. पेशवे येणार म्हणून वाखरे सावकारांनी पैठणमध्ये तीन चौकांचा बांधलेला वाडा अजूनही व्यवस्थित आहे. तिकडे पानिपतावर दिवसांमागून दिवस मराठ्यांवर मोठी संकटे येऊ लागली होती. म्हणून मोठा फौजफाटा घेऊन नाना उत्तरेत त्यांच्या मदतीला निघाले होते. रस्त्यात हा उद्योग पूर्ण केला.
राधाबाई नारायणराव वाखरे हे त्या मुलीचे नाव असून लग्नासमयी तिचे वय होते फक्त नऊ वर्षांचे. पुढच्या पंधरा दिवसांत पानिपतचे युद्ध होऊन त्यात नानांचे भाऊ व मुलगा विश्वासराव मारले गेले. पानिपतकडे निघालेले नाना परत फिरले. युद्धातील भयानक परिणामामुळे नानांचे भान गेले. त्यात क्षयाची बाधा असल्याने दिवसेंदिवस ताप बळावत गेला.कारभारावरचा त्यांचा ताबा सुटला. शेवटी ते पर्वतीवर जाऊन राहू लागले. वाताच्या झटक्यात ‘भाऊ-भाऊ’ असे किंचाळत नानांनी प्राण सोडला.
९ वर्षांच्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत नानांनी जगाचा निरोप घेतला. काही कळायच्या आत लादलेल्या वैधव्यामुळे राधाबार्इंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. प्रकृती एवढी ढासळली की पालखीतही त्यांना उचलून झोपवावे लागायचे. शेवटी १६७१ ला त्यांनीही जगाचा निरोप घेतला. नऊ वर्षांची असताना लग्न व दहा वर्षे विधवा म्हणून जगणे हेच राधाबार्इंचे संपूर्ण जीवन.
अशा प्रकारचा पराक्रम महादजी शिंदेंच्या बाबतीत दिसून येतो. ग्वाल्हेरचे सिंदिया म्हणून गाजलेले महादजी शिंदेचे मूळ कोरेगाव तालुक्यातील कण्हेरवाडीचे असून या घराण्यातील राणोजी, दत्ताजी, जयप्पा अशांनी स्वराज्याकरिता बलिदान दिले. पानिपत युद्धात गनिमीचा एक वार गुडघ्यावर बसल्याने महादजी शिंदे कायमचे लंगडे झाले होते. परंतु राणेखान नावाच्या पखालजीने त्यांना वाचविल्याने महादजीने त्याला आपला सेनापती नेमले होते. डी बॉयन नावाच्या ब्रिटिश सेनापतीच्या नेतृत्वाखाली महादजीने देशातील तुळजापुरातील भोप्याच्या मुलीशी विवाह करण्याची कल्पना मांडली. तुळजापुरातील बरेच भोपे कदम गावातून निघून गेले. शेवटी आनंदराव भोपे कदम यांची १३ वर्षांची कन्या लक्ष्मीबाई माधवरावांसाठी निश्चित करण्यात येऊन मंदिरातच विवाह झाला.
लाखाची फौज घेऊन माधवराव स्वराज्याची घडी बसवत पुण्याच्या दिशेने निघाले. लग्नाला जेमतेम वर्ष झालेले असताना पुण्याजवळील वानवडी या ठिकाणी १७९४ रोजी महादजी भयंकर आजारी पडले. कित्येक दिवस झाले तरी प्रकृतीत काही फरक पडला नाही. म्हणून कारभा-यांच्या सांगण्यावरून लक्ष्मीबाई व महादजींचा दत्तक पुत्र दौलतरावांना तुळजाभवानीचा अंगारा आणण्याकरिता पाठविण्यात आले. त्याचा काही उपयोग झाला नाही. रस्त्यातच त्यांना बातमी समजली की, महाराजांचे निधन झालेले आहे. लक्ष्मीबाई तातडीने पुण्याला गेल्या आणि त्यांचा अन्त्यविधी उरकण्यात आला.
लक्ष्मीबार्इंचे नशीब त्यांना सती जाऊ दिले नाही. ऐन तारुण्यात पदार्पण करताना प्रचंड निराशा मात्र त्यांच्या पदरी पडली. महादजींचे नऊ विवाह झाले असले तरी दौलतरावाला दत्तक घ्यावे लागले. साहजिकच वाटणीचा प्रश्न उभा राहिला. दौलतरावाने विधवा बायकांचे अतोनात हाल करायला सुरुवात केली तेव्हा तुळजाभवानीच्या दरबारातील लक्ष्मीबार्इंनी आपल्या हातात तलवार घेतली आणि भेट स्वराज्यातील अनेक गावांवर हल्ला चढविला. पळसदेव, भाळवणी, कासेगाव या ठिकाणच्या गावांना त्यांची विशेष झळ पोहोचली. या समयी लखबादादा लाडने त्यांना फार मोलाची मदत केली. पुढे मराठे सरदारांच्या मदतीने दौलतरावाने आपल्या सर्व विधवा मातांना सामावून घेतले. त्यामुळे स्वराज्य उभारणी कामी लक्ष्मीबार्इंनी मोठे योगदान दिले. अशातच मध्य प्रदेशातील दतिया या ठिकाणी लक्ष्मीबार्इंचेही निधन झाले.
खरे तर नानासाहेब पेशवे म्हणजे चालतेबोलते संगणक तर महादजी शिंदे म्हणजे रणांगणावरील आग. दोघांच्या पराक्रमामुळे मराठ्यांचे साम्राज्य हे देशभर पसरले. परंतु दोघांनाही अशा जरठकुमारी विवाहाची उपरती का व्हावी असा प्रश्न पडतो. परंतु इतिहासात जर-तरला महत्त्व नसते. इतिहासाने आज नानासाहेबांना मुत्सद्दी, धुरंधर तर महादजींना ग्रेट मराठा अशा किती तरी पदव्या दिल्या. परंतु फक्त ९ वर्षांच्या राधाबाई व १३ वर्षांच्या लक्ष्मीबाई यांच्या वैधव्याचे काय? या अभागी मुली बाहुलीसारख्या जन्माला येऊन लगेच निघूनही गेल्या. त्यामुळेच असा प्रश्न पडतो की, या मराठा सरदारांनी असे का केले असेल?
डॉ. सतीश कदम
मोबा. ९४२२६ ५००४४
 TAGS:

COMMENTS


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या