परंडा किल्ला

परंडा किल्ला म्हणजे दारूगोळ्याचे भांडार



उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत. प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी. या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो. त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स. ११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे. 

देवगिरीच्या यादवांकडून बदामीच्या चालुक्याकडे परंडा गेल्यानंतर गावाला परगण्याचा दर्जा मिळाला. चालुक्यांनी सुरुवातीला छोटीशी किल्लेवजा गढी बांधली होती. पुढे बहामनी सुलतानाकडे परंडा आल्यानंतर दिवाण महंमद ख्वाजा गवान याने इ.स. १४७० च्या आसपास परंड्याचा किल्ला बांधलेला आहे. भुईकोट प्रकारातील परंडा किल्ला हा दक्षिणेतील सत्ताधा-यांसाठी केंद्रस्थानी असून परंडा हे विजापूर, हैदराबाद, सह्याद्री परिसरात जाण्यासाठी मध्यभागी होते. मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता तर परंड्याची महसूल वसुली २० लाखांवर होती. आजही आपण परंडा किल्ल्याबाबत अनभिज्ञ असलो तरी २०११ साली फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसच्या पुरातत्त्व शाखेतील विद्यार्थी निकोलस आणि व्हर्जिनिया यांनी परंड्याच्या किल्ल्यावर पीएच.डी केलेली आहे. 

बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा हा अहमदनगरच्या निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून येथूनच कारभार चालविला. त्यामुळे जिजाबार्इंच्या रूपाने छत्रपतींचे वास्तव्य परंड्यात राहिले होते. अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळातच येथील २६ बुरुजांवर विविध तोफा ठेवण्यात आल्या. यापैकी मलिक- इ-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मुलुखमैदान (मलिक-इ-मैदान) तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. साधारणपणे २२ मे १६३२ ला विजापूरच्या आदिलशहाचा दिवाण मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची ही तोफ विजापूरला नेली. त्यापूर्वी नगरचा दिवाण मलिक अंबरने सोलापूरवर तिचा वापर केला होता. 

आयताकृती बांधकाम, दोन पदरी संरक्षक भिंत, महाकाल, चंचल, शहामटकल यासारख्या जवळपास ५० फूट उंचीच्या २६ बुरुजांनी परंडा किल्ला सज्ज असून संपूर्ण किल्ल्याला बाहेरून रुंद असा खंदक खोदलेला आहे. उत्तरेकडील बुरुजादरम्यान मुख्य प्रवेशद्वार रेखीव लाकडात असून त्यावर अनकुचीदार खिळे बसविलेले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर प्रत्यक्षपणे कोणीही आक्रमण केलेले नाही. तरीपण किल्ल्यामध्ये आजही असंख्य तोफा व त्याचे भव्य आकाराचे तोफगोळे पाहिल्यानंतर हा काय प्रकार आहे हे लवकर लक्षात येत नाही. कारण एवढी युद्धसामुग्री अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर सापडत नाही. त्यामुळे परंडा किल्ल्यावर राज्य करणा-या सत्ताधा-यांनी परंडा मध्यवर्ती ठिकाणावर असल्याने परंड्याच्या किल्ल्याला दारूगोळ्याचे भांडार बनविले होते. 

इ.स. १६५७ पर्यंत परंडा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात असल्याने त्याचा दिवाण मुरार जगदेवने किल्ल्यात नरसिंह मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. आजही किल्ल्यात साधारणपणे ५ फूट उंचीची व ६ हातांची गणेशमूर्ती वेगळेपण दाखवितात. हेमाडपंथी शैलीतील बांधकामात असणारी मस्जिद हे पण या ठिकाणचे वेगळे वैशिष्ट्य आहे. आजही किल्ल्याच्या बुरुजावर असणारी पंचधातूची तोफ पाहताना आश्चर्य वाटायला लागते. त्यावर फारसी भाषेत कोरीव काम आहे. तर तेथील एका भांडारगृहात असंख्य तोफगोळे पडलेले असून त्यापैकी एकावर ईस्ट इंडिया कंपनीचा शिक्का असून १६२७ ही तारीख कोरलेली आहे. पेशवे दफ्तरातील खंड ३८ मधील पत्र क्र. १४ नुसार याठिकाणच्या तोफा या निजामाचे जहागिरदार रावरंभा निंबाळकरांनी पेडगावहून आणून परंड्याच्या किल्ल्यावर बसविल्या. किल्ल्यातील महादेवाचे मंदिर आणि मस्जिदीच्या व्यवस्थेकरिता हैदराबादच्या निजामाने १२५ हेक्टर जमीन इनाम दिली होती. 
प्राचीन काळापासून परंडा किल्ला परगणा म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असून बहामनी काळात ख्वाजा जहान तर आदिलशाहीत गालीब खान हे किल्लेदार राहिले आहेत. पुढे १६५७ साली मोगलांनी परंडा जिंकून घेतल्यानंतर मीर महंमदखान आणि इज्जतखान हे किल्लेदार होते. पैकी १९ जुलै १६९४ च्या एका पत्रानुसार किल्लेदार इज्जतखानाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इज्जतपुरा नावाने नवीच वस्ती वसविली होती. त्याच्याच काळात परंडा किल्ल्यात रोगाची साथ पसरल्याची नोंद आहे. मध्ययुगीन कालखंडात परंड्याप्रमाणे नळदुर्ग हा जिल्हा असला तरी नळदुर्गमधील किल्ल्यातल्या एका बुरुजाला परंडा बुरूज हे नाव आहे. परंड्याच्या किल्ल्यात भरपूर युद्धसामग्री साठवून ठेवलेली होती. १६८१ ते १७०७ अशी २६ वर्षे दक्षिणेत राहिलेल्या औरंगजेबाने परंड्याकडे अधिक लक्ष पुरविले होते. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने परंड्याच्या किल्लेदाराला किल्ल्याबाहेर पडण्याला मनाई करण्यात आली होती. औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रानुसार परंडा किल्ल्यातील हालचाली समजण्यास मदत होते. त्यानुसार इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजाने पुण्यावर आक्रमण केले होते. तेव्हा मोगलांना धडा शिकवावा म्हणून छत्रपती शिवरायांनी सेनापती नेताजी पालकरला मोगली प्रांतावर आक्रमण करण्यास सांगितले. तेव्हा नेताजीने परंडा किल्ल्याभोवतीच्या परिसरात धुमाकूळ माजविला होता. मोगलांची फौज परंड्यात येण्यापूर्वीच नेताजी पालकर केव्हाच पसार झाला होता.स्वराज्याचा घास घ्यायला आलेला मिर्झाराजा जयसिंह शिवरायांना आग््रयाला पाठविण्यात यशस्वी ठरला होता. परंतु राजे तेथून निसटले तसे बादशहाने मिर्झाराजावर गैरमर्जी केली. उत्तरेकडे परत जात असताना १७ जानेवारी १६६६ ला मिर्झाराजांचा मुक्काम हा परंड्याजवळ ककराला परिसरात राहिला होता. जयपूर घराण्याचे आणि परंड्याचे नाते तसे अतूट म्हणावे लागेल. कारण परंडा मुक्कामी असतानाच मिर्झाराजाचा नातू किशनसिंगाला एका बाईच्या प्रकरणावरून अफगाणी लोकांनी ठेचून मारले होते. परंडा किल्ला परिसरात त्याची समाधी असावी, कारण मिर्झाराजा हा दक्षिणेचा सुभेदार होता. 

१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता. असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. अशारीतीने धनाजीने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते. एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही. 
इ.स. १६७८ साली मोगलांचा सेनापती दिलेरखान आणि दारूगोळ्याचा एक अधिकारी व ‘तारिखे दिल्कुशा’ ग्रंथाचा लेखक भीमसेन सक्सेना यांचा मुक्काम बरेच दिवस परंडा किल्ल्यात होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी किल्ल्याशेजारील तलावाचा गाळ काढून त्याची स्वच्छता केली होती. मध्ययुगातील मोठा सेनापती व तत्कालीन काळातील अंबानी शोभणारा मीरजुम्ला, औरंगजेबाचा सेनापती बहरामंदखान, शिवरायांचा वकील काझी हैदर यांचाही मुक्काम किल्ल्यात राहिला आहे. इंग्लंडच्या राजाचा वकील थॉमस तसेच बादशहाच्या तोफखान्याचा प्रमुख व नामांकित डॉक्टर निकोलस मनुची यांचाही या किल्ल्याने पाहुणचार केलेला आहे. 

विजापूर ते नगर दरम्यान परंडा हे महत्त्वाचे ठाणे असल्याने आदिलशहा, निजामशहा यांच्यासारख्या अनेकांनी या किल्ल्यात वेळ घालविला आहे. बादशहाच्या वाहतूक शाखेचा प्रमुख व दतिमाचा राजा रावदब्यत, बुंदेलाचा शुभकर्ण बुंदेला विजापूरहून दतिया मध्य प्रदेशकडे परत जात असताना नोव्हेंबर १६७९ साली तो परंडा मुक्कामी मरण पावला. यावेळी त्याच्या पत्नी सती गेल्या. त्याचा मुलगा रावदब्यतने तेथे समाधी आणि एक मंदिर बांधले १९७० च्या उस्मानाबाद गॅझेटिअरमध्ये याची नोंद सापडते असा हा बहुआयामी किल्ला पाहावा म्हणून १७९५ च्या खड्र्याच्या लढाईत विजय मिळवून पुण्याकडे जाताना पेशवा सवाई माधवराव, नाना फडणीस यांच्यासह शिंदे, होळकर, रघुजी भोसले यांनी किल्ल्याला भेट दिली होती. सोनारीच्या भैरोबाचे दर्शन घेऊन ते पुढे गेले. मध्यंतरीचा काही कालखंड परंडा परिसरातील काही भाग मराठ्यांकडे राहिल्याने महाराणी ताराबार्इंनी आजच्या बार्शी तालुक्यातील शेळगाव आणि भालगाव ही गावे देवीच्या उत्सवाकरिता दान दिली होती. पत्रात परगणे परिंडे अशी नोंद आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण व संरक्षणासाठी मजबूत ठाणे राहिल्याने युद्धसामुग्री तयार करणा-या रजपुतांची येथे वस्ती राहिली आहे. आज आपण जुन्या वैभवाला साक्षी ठेवून परंड्याचा किल्ला स्वच्छ कसा ठेवता येईल हेच पाहावे. 

डॉ. सतीश कदम 
मोबा. ९४२२६ ५००४४ 


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

pls tell me what your mind.