तुळजाभवानीचा पलंग


तुळजाभवानीचा पलंग

श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा प्रवास हा खूप थक्क करणारा आहे चला तर आपण पाहूया श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा बनविण्यापासून ते तुळजापुरात पोहोचण्यापर्यंत चा सर्व प्रवास...!!

श्री तुळजाभवानी मातेचा पलंग हा बनविण्याचा मान मूळचे घोडेगाव (भिमाशंकरजवळ) पण सध्या पुण्यात स्थायिक असणारे ठाकूर (कातारी) कुटुंबियांना आहे. त्यांना हा मान राजमाता जिजाऊंच्या नवसपूर्तीमुळे राजे शहाजी यांनी त्यांना दिला व घोडेगाव येथे बक्षीस म्हणून जागा सुद्धा दिलेली आहे. पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकुड, रंगकाम कामाकरिता लाखाचे रंग, लोखंडी साहीत्य खिळे पट्टी,सुती नवार पट्टी,दोरखंड,गादीसाठी कापुस,छताकरिता कापड तसेच इतर लागणारे सर्वे काही साहित्य ही जबाबदारीने अहमदनगर येथील पलंगे (तेली) घराण्याकडुन ठाकूर कुटुंबियांना पुरवले जातात.

मग हे ठाकूर कुटुंबिय रविवार पेठ,पुणे येथे स्वताचे दुकानात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मुख्य पुजारी मानकरी श्री पलंगे कुटुंबिय आणि ठाकूर कुटुंबिय यांचे हस्ते लाकडाचे पूजन होऊन आषाढ महिना ते नागपंचमी असे सुमारे ३० ते ३५ दिवस ठाकूर परिवार पलंगाचे भाग बनवत असतात. भाग बनवून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पूर्ण भागांची पूजा होऊन पलंगाचे भाग घोडेगाव येथे आणले जातात.

श्रावण शुद्ध षष्टी ते श्रावण सप्तमी पर्यंत घोडेगाव येथील भागवत कुटुंबिय हे पलंगाचे भाग जोडत असतात. भाग जोडणी च्या आधी भागवत कुटुंबिय आणि पलंगे कुटुंबिय यांचेकडून पलंग भाग जोडणीची पूजा संपन्न होऊन पलंग जोडणीला सुरवात होते. एकदा का पूजन संपन्न झाले की पलंग बनवायला घेतल्यावर संपुर्ण जोडणी होईपर्यंत भागवत कुटुंबिय कुठलीही विश्रांती न घेता ही सेवा मनोभावे करत असतात. कृष्णाष्टमीला सकाळी पलंग संपूर्ण बनवून होतो.

पलंग घोडेगाव मध्ये बनवून पूर्ण झाल्यावर त्याच्यावर दोरखंडाची बांधणी पलंगे कुटुंबियांकडून केली जाते आणि मग तो पलंग संपूर्ण घोडेगाव मध्ये फिरवतात दवंडी पिटवतात की श्री तुळजाभवानी मातेचा श्रमनिद्रेसाठी असणारा पलंग बनवून पूर्ण झाला. मिरवणूक ठाकूर कुटुंबिय बीयांचे घोडेगाव येथील घरासमोर ठेवतात आणि मग पलंग बांधणीची पहिली मानाची आरती ठाकूर कुटुंबिय यांच्याकडून होते. मिरवणूक संपन्न झाल्यावर पलंग घोडेगाव येथील तिळवण तेली समाज ट्रस्ट चे श्री शनैश्वर मंदिरात ठेवतात. मग पलंगाचे मध्ये सुती नवार पट्टीची बांधणी श्री. पलंगे कुटुंबिय आणि घोडेगाव येथील सेवेकरी यांच्या हस्ते होते. सुती कापड छतावर टाकले जाते आणि सुती नवार पट्टीवर एक नवीन सुती कापड टाकले जाते.

मग श्री तुळजाभवानी मातेचा पलंग ऋषीपंचमी ला जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे तेली बुधवार पेठ येथील तिळवण तेली समाज धर्मशाळेत आणला जातो. इथे पलंग आल्यानंतर पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी पलंगावर विधिवत श्री तुळजाभवानी मातेची स्थापना होते. त्यात पलंगे कुटुंबिय यांच्याकडून देवीच्या निद्रेसाठी मानाची गादी,तक्या स्थापन होते.

श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नर मध्ये १० दिवस वास्तव्य असते कारण जिजाऊंच्या नवसपूर्तीमुळे  जिजाऊंनी जुन्नर मधून पलंगाच्या प्रवासाला सुरवात केली. इतिहासात उल्लेख आढळतो की राजमाता जिजाऊ श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे दर्शनासाठी यायच्या.

जुन्नर मधील वास्तव्यनंतर पलंगाचे श्री क्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान होते.श्री तुळजाभवानी मातेचा पलंग खांद्यावर डोक्यावर वाहून पायी तुळजापूरला नेण्याची परंपरा आहे.

आता आपण पाहूया थक्क करणारा प्रवास..!!
श्री तुळजाभवानी मातेचा पलंग ५ जिल्हे (पुणे,अहमदनगर,बीड,सोलापूर, उस्मानाबाद) फिरून तुळजापूर मध्ये पोहोचतो...!!

पुणे जिल्हा प्रवास
१) घोडेगाव ( १२ दिवस मुक्काम - १३ व्या दिवशी प्रस्थान)
२) घोडेगाव ते निमदरी ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १७ किमी.)
३) निमदरी ते जुन्नर ( १० दिवस मुक्काम ११ व्या दिवशी प्रस्थान, प्रवास ९ किमी.)
४) जुन्नर ते कुमशेत ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ५ किमी.)
५) कुमशेत ते हापुसबाग ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ६ किमी.)
६) हापुसबाग ते नारायणगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १५ किमी.)
७) नारायणगाव ते आळे ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास २५ किमी.)
८) आळे ते राजुरी ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ४ किमी.)

अहमदनगर जिल्हा प्रवास
९) राजुरी ते अळकुटी ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १६ किमी.)
१०) अळकुटी ते वडझिरे ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १३ किमी.)
११) वडझिरे ते पारनेर ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास २५ किमी.)
१२) पारनेर ते कान्हूर पठार ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १३ किमी.)
१३) कान्हूर पठार ते किन्ही ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ७ किमी.)
१४) किन्ही ते गोरेगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ६ किमी.)
१५) गोरेगाव ते टाकळी खातगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास २० किमी.)
१६) टाकळी खातगाव ते भूतकरवाडी ताठेमळा ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १९ किमी.)
१७) ताठेमळा ते नालेगाव ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ५ किमी.)
१८) नालेगाव ते सबजेल चौक अहमदनगर ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास १० किमी.)
१९) सबजेल चौक ते कलेक्टर ऑफिस चौक अहमदनगर ( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान, प्रवास ५ किमी.)

पुणे जिल्हा ते अहमदनगर जिल्हा या मधले मुक्कामाचे आणि मधले सर्व विसाव्याचे गाव धरून श्री तुळजाभवानी मातेचा पलंग ३९ दिवस २२० किलोमीटर प्रवास करून नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला भिंगार ला पोहोचतो भिंगार ला रात्री ११ ते १२ च्या दरम्यान श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन पालखीची आणि श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रा पलंगाची ऐतिहासिक भेट मारुती मंदिर येथे पार पडते.

नंतर श्री तुळजाभवानी मातेचा पलंग बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा असा नवरात्रीची तिसरी माळ ते नवरात्राची नववी माळ अशी ७ दिवस  २४ तास म्हणजे दिवस रात्र प्रवास करत असतो. नगरलगत असणारी लोणी सय्यदमीर, कुंटेफळ, चिंचोडी पाटील,कुंडी या चार मानाच्या गावचे भक्त पलंगासोबत सेवा करण्याचे काम करत असतात.

बीड जिल्हा,सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा प्रवास
पुढे ७ दिवसांमध्ये पलंगाचा प्रवास मार्ग निमोडी, सारोळा, लोणी सय्यदमीर, कुंटेफळ, चिंचोडी पाटील, कुंडी, धानोरा, कडा, आष्टी, पांढरी, जामखेड, खर्डा, भूम, ओरसाली, आगळगाव, बाभळगाव (ता. बार्शी) , दगडधानोरा, घारीपुरी, कारिनारी, झरेगाव, बोरगावहून चिलवडी (ता. उस्मानाबाद), आपसिंगा आणि दसऱ्याच्या आधल्या दिवशी तुळजापुरातील मोतीझरा येथे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहोचतो. पहा ना असा २२० किलोमीटर प्रवास फक्त ७ दिवसात हा तुळजाभवानी मातेचा श्रमनिद्रा पलंग प्रवास करून श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये पोहोचतो...!!

घोडेगावपासून श्री क्षेत्र तुळजापुरात पलंग पोहोचायला तब्बल ४६ दिवस लागतात.

म्हणजे पहा ना घोडेगाव ते अहमदनगर असा प्रवास करायला ३९ दिवस लागून सर्व प्रवास हा २२० किलोमीटर असतो. तर नवरात्र तिसरी माळ ते नवरात्र नववी माळ असे ७ दिवस लागून पुढील २२० किलोमीटर प्रवास दिवस रात्र करत असतो. हे खूप विचार करायला आणि थक्क करणार आहे.

ज्या प्रमाणे नवरात्रात ९ दिवस देवी महिषासुराशी युद्ध करते आणि जिकल्यानंतर श्रम जाण्यासाठी देवी श्रमनिद्रा घेते तसाच हा श्रमनिद्रा पलंग ७ दिवस रात्र दिवस कंपायी चालत असतो आणि देवीच्या श्रमनिद्रा साठी तुळजापुरात पोहोचतो.

शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. प्रपंचाची पर्वा न करता धर्मासाठी राबणारे हात अजूनही शिल्लक आहेत हेच घोडेगावचे ठाकूर (कातारी) कुटुंबिय, भागवत (सुतार) कुटुंबिय आणि नगरचे पलंगे (तेली) कुटुंबिय  या घराण्याने दाखवुन दिले आहे.

लेखन सौजन्य... आशिष वैभव शिंदे,राजुरी (जुन्नर)

आईराजा उदो उदो..!!






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या