रावरंभा निंबाळकरांची मूळ समाधी ही माढ्यातच

                                         रावरंभा निंबाळकरांची मूळ समाधी ही माढ्यातच 

              छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या आणि संभाजीराजांची बहीण सखुबाई यांचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकरांशी झालेला असून त्यांचे नातू रंभाजी निंबाळकर हे फार पराक्रमी व्यक्तिमत्व होऊन गेले. धनाजी जाधवांबरोबर अनेक मोहिमेत त्यांनी भाग घेतला होता.  अहमदनगर येथे खुद्द औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करण्याचा पराक्रम त्यांनी केला. त्यानंतर दुर्देवाने संभाजीपुत्र छत्रपती शाहूंचे कारभारी पेशवे बाळाजी विश्वनाथसोबत वितुष्ट आल्याने ते मोगलांना जाऊन मिळाले. इ.स. १७१० ते १७३६ ही त्यांची कारकीर्द असून या दरम्यान त्यांचे वास्तव्य माढा याठिकाणी राहिले. पुढे मोगलांच्यावतीने हैद्राबादच्या निजामाकडे त्यांनी एक जहागीरदार म्हणून  पुणे, बारामती, नळदुर्ग, तुळजापूर, अहमदनगर, करमाळा, रोपळे, शेंद्री याठिकानाचा कारभार केला. माढ्याची किल्लेवजा गढी   आणि माढेश्वरीचे मंदिर ही त्यांचीच देण आहे. त्यांच्याकडे जहागिरीत अनेक गावे असल्याने त्यांच्या वंशजांच्या त्याठिकाणी समाध्या आढळून येतात. त्यामुळे रावरंभाच्या समाधीविषयी काही तर्कवितर्क मांडले जातात. परंतु माढा याठिकाणी निंबाळकरांच्या अनेक समाध्या असून त्यातील एका समाधीवर श्री रावरंभाजी निंबाळकर असा स्पष्टपणे उल्लेख असल्याने रावरंभाची मूळ समाधी ही माढ्यातच असल्याचे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. सतीश कदम यांनी व्यक्त केले आहे. 
                 रंभाजी निंबाळकर हा या घराण्याचा मूळ पुरुष असून १७२४ साली हैद्राबादच्या निजामाने त्यांना रावरंभा हा 'किताब दिला होता. या घराण्यात इ. स. पुढे सहा पराक्रमी पुरुष होऊन गेले. त्या प्रत्येकाने स्वतःला रावरंभा हि पदवी लावून घेतल्याने अभ्यास करताना मोठा गोंधळ होतो. तुळजापुरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख असलेल्या कदम यांनी रावरंभा निंबाळकर घराण्यावर संशोधन हाती घेतलेले असून याकरिता त्यांनी इंग्रजी, फ्रेंच, उर्दू भाषेतील अनेक संदर्भ जमा केलेले आहेत. रावरंभा घराण्याला गो.स. सरदेसायांनी एका दिवाळी अंकाचा संदर्भ देऊन दासीपुत्र ठरवले आहे. हा संदर्भही त्यांनी खोडून काढला असून रावरंभाचे घराणे हे खानदानी निंबाळकरापैकी एक असून त्याचे अनेक दाखले त्यांनी दिले आहेत.
            रंभाजी उर्फ रावरंभाला खंडेराव,जानोजी,सुलतानराव  आणि महादजी चार मुले असून खंडेरावयाचे लवकरच निधन झाले तर इतर तीन मुलांना त्यांनी जानोजी करमाळा, सुलतानजीं अपसिंगा ( तुळजापूर ) आणि महादजीला माढा याप्रमाणे जहागीर देऊन स्थिर केले. या महादजींनी पुढे १७३० ते १७६० च्या दरम्यान माढ्यातील विठ्ठलाचे मंदिर बांधलेले आहे. रा.ची. ढेरे यांनी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती काही काळ माढ्यात आणल्याचा दावा त्यांनी चुकीचा असल्याचे सनावळीनुसार स्पष्ट केले. इतर समाध्यांपैकी विठ्ठल मंदिरासमोरील समाधी ही महादजीची तर माढेश्वरीच्या मंदिरासमोरील तीन समाध्या या महादजीचे वारसदार भगवंतराव निंबाळकर आणि त्यांच्या दोन पत्नीच्या असल्याचा दावा कदम यांनी केला. अशारितीने आपल्या मुलांना जहागिरीची व्यवस्थित वाटणी करून पहिले रावरंभा यांनी माढ्यातच आपला अखेरचा श्वास घेतला. करमाळ्यातील एका मोठ्या समाधीवरून संशोधकात काही संभ्रम असलातरी रावरंभाकडे करमाळा हे १७२४ साली आलेले आहे. तर करमाळ्यातील कमलाभवानीचे बांधकाम हे रावरंभाचे पुत्र जानोजी यांनी १७४० नंतर केलेले आहे. तर रावरंभाचे निधन हे १७३६ साली झालेले आहे. अशारितीने तारखेची सुसंगती आणि माढ्यातील समाधीवर असलेल्या शिलालेखावरून माढ्याची समाधी हीच रावरंभा निंबाळकरांची असल्याचा दावा केल्याने माढ्याचा इतिहासात भर पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या