उपळा मर्डर केस भाग १
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आजच्या उस्मानाबाद
तालुक्यातील काजळा, वाघोली, येडशी
आणि तडवळे ही गावे
सोलापूर जिल्ह्यात होती. त्यामुळे आपल्या
शेजारी पै पाहुण्यांसह बाजारहाट करायचा म्हटल्यानंतर
त्यांना निजाम स्टेट अर्थातच परदेशात गेल्यासारखे होते. त्यातच
उपळा गाव म्हटलं की माकडाचे नाव आपसूकच येते. उस्मानाबादच्या
बाजूला दोन दोन उपळे आहेत, पश्चिमेला रामनाथाचे उपळे तर पूर्वेला माकडाचे उपळे. उपळ्याला
हा संदर्भ कुठून लागला माहित नाही. पन्नास एक वर्षांपूर्वी शे-दोनशे माकडे उपळ्याच्या वेशीत
असायची. गावात उपळेकर महाराजांची समाधी आणि हेमाडपंती शैलीतील शिवमंदिर आणि त्याच्या बाजूला असणारा बारव पाहिल्यानंतर
उपळे हे प्राचीन गाव आहे हे सांगण्याची गरज नाही.
उपळ्याच्या जवळच रामलिंगचे देवस्थान
लागते त्यामुळे उपळ्याचा संदर्भ थेट रामायणापर्यंत जातो. कितीही
त्रास झाला तरी उपळेकरांनी हनुमानाच्यारुपात माकडाला आपलं मानलं आणि त्यांच्या राहण्याकरिता वेशीच्या
बाजूला भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ दोन मजली माडी बांधून
दिली. माकडापासून कधी कोणाला त्रास झाला नाही. शंभरेक वर्षांपूर्वी माकडाचा महिमा
इंग्रजांनाही जाणवला होता म्हणूनच 1780 ला सोलापूरचे कलेक्टर स्प्रे यांनी सर्वे नंबर 234 मधील 33. 5 एकर
जमीन माकडाच्या देखभाल दुरुस्तीसाठी रामा घोंगडे यांच्याकडे इनाम दिली होती. गावकऱ्यांनीही
माकडावर भरपूर प्रेम केलं. आपली कामे व्हावीत म्हणून
लोक त्यांना
नवस करायची. एका माकडाला तर उपळेकराने चक्क सोन्याची अंगठी
घातली होती त्यामुळे त्या माकडाला नाव पडले ‘मुद्या माकड’ ! मुद्या माकडाबरोबरच
एक लाली माकडीणपण होती. कुठल्याही लग्नात
नवरदेव मारुतीच्या मंदिरात पारावर
बसला की, पहिला आहेर माकडाला असायचा.
अशारितीने माकडावर प्रेम करणारे उपळेकर हैदराबाद संस्थानमध्ये
चालणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतील तर नवलच. 1947- 48 साली हैदराबाद
संस्थानमध्ये अंदाधुंदी माजली होती. त्यातच उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून मोहम्मद हैदरने कारभार
हाती घेतला आणि पाहता पाहता उस्मानाबाद जिल्हात आपली दहशत निर्माण केली. उपळ्याचा तालुका बार्शी असलातरी बाजारहाट करण्याकरिता त्यांना येडशी किंवा उस्मानाबादला यावं लागायचं. चिलवडी, उस्मानाबाद, पोहनेर, तडवळा यासारख्या शेजारच्या गावात त्यांची सोयरीक
होती. मात्र निजाम राजवटीमुळे त्यांना आपल्या गावातून दुसऱ्यागावात जायचे असेलतर
सीमारेषा पार करून जावे लागत होते.
कारण उपळाच्या बाजूला किणी, आळणी आणि शिंगोली याठिकाणी निजामाचे करोडगिरी नाके होते.
माणूस अगदी पाकिस्तानतून आल्यागत नाक्यावर तपासणी
व्हायची. नाक्यावरचे रझाकार भोळ्याभाबड्या जनतेला वाटेल ते बोलायचे. परंतु इंग्रज
राजवटीत असल्यामुळे उपळेकर रझाकाराला भीक
घालत नव्हते. त्यामुळे करोडगिरी नाक्यावरून जात असताना उपळेकर आणि रझाकरांची कुरबूर
व्हायची. संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. उपळेकरांच्या मनातही आता स्वातंत्र्याची
ज्वाला भडकायला लागली होती. गावातील काही शिकलेली मंडळी एकत्र यायला लागली. लिंबा
यादव घोगरे उर्फ बळवंतराव त्यापैकीच एक. बळवंतरावांनी एकेक करून माणसं गोळा करणे
सुरू केले.
गप्पाचे रूपांतर आता बैठकीत होऊ लागले.शिवा पडवळासारखा माणूस
न सांगताही पुढे आला. तर हिरा अब्बाससारखा सच्चा मुसलमान निजामाला गाडण्याची भाषा
करु लागला. जगदीश चुनीलाल गौडसारख्या मारवाड्या ला यामुळे बळ मिळाले. मांगाचा
जगन्नाथ व आठब्या, वडराचा नागा आणि शिरपती माळ्यासारखी अठरापगड
जाती ची माणसं एकत्र आली. पाहता पाहता काहीतरी करायची ऊर्मी निर्माण झाली. आंधार्या
रात्री कीssर आवाजात उपळ्याच्या शिवारात प्रथमत:च आज एक
ललकारी झडली. भारत माता sss की जय.
जगदीश गौड म्हणाला आरं आपुन एकत्र
आलो पण करायचं काय ? कोण म्हणाला उस्मानाबादचं गोडाऊन लुटू, तर कोण म्हणालं
करोडगिरी नाक्यावर हल्ला करू. निवृत्तीआप्पा देशमुख हे सर्व काही गुपचूप ऐकत होते.
आप्पाच्या खांद्याला बंदूक होती. बंदुकीवर हात फिरवतच ते म्हणाले, तुम्हाला काय ठरवायचे ठरवा माझी बंधू तयार आहे.
बैठकांवर बैठका घेऊन शेवटी निर्णय करण्यात आला
की, आपल्याच गावाच्या रोडवर निजामाची बस
लुटायची. बेत पक्का झाला. 1870 साली निजामाने अनेक
रस्त्यांची निर्मिती केली होती. त्यावरून बसही धावायला लागल्या होत्या.
उस्मानाबादचे बस स्टँड त्यावेळी आजच्या सिव्हील हॉस्पिटलच्या बाजूला होते. त्या
ठिकाणाहून सोलापूर, बार्शी, हैदराबाद, लातूर, औरंगाबाद अशा बस मिळायच्या. सोलापूर
उस्मानाबादचे तिकीट फक्त दोन आणे तर सायकलची किंमत केवळ पाच रुपये होती.
प्रवाशांची संख्या नगण्य असल्याने बसस्थानकांवर गाडी आली की,
क्लिनर गाडी आली हो sss म्हणत गल्लीत वर्दी देत फिरायचा.
अवजड सामान असेल तर घरापासून बस मध्ये नेऊन टाकायचा.
गाडी अडवायची तर मग कुणी काय करायचे याचा बेत
निश्चित करण्यात आला. शत्रुसोबत दोन हात करायचे तर आधी तयारीनिशी उतरावे लागते.
उपळेकरांनी तशी तयारी केली होती. सगळा मागमूस काढला होता. त्याकाळी उस्मानाबादहून परळीला
रोज गाडी होती. ती परळी उस्मानाबाद गाडी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी परळीहून निघाल्यानंतर अंबाजोगाई, कळंब, येरमाळा, येडशीमार्गे 27
थांबे घेत रात्री साडेआठ वाजता उस्मानाबादला पोहचायची.
स्वातंत्र्यसेनानीचे गणित पक्के होते.
ठरल्याप्रमाणे शिवा पडवळ, गणपती माळी, जगदीश
गौड हे येडशीमध्ये गाडीत बसणार होता. त्यांना कुठं गावाला जायचं नव्हतं, तर निजामच्या गाडीला आपल्या गावाला न्यायच होत. त्यांच्यासोबत गाडीमध्ये जेमतेम
9-10 प्रवाशी होते. गाडीच्या कंडक्टरने विचारलं, ओय कहा जाने
का है ? मनातल्या मनात शिवा म्हणाला, आ
बे sss जाने का नयी, तेरेकू लेके
जानेका है. असं म्हणत या तिघांनी उपळ्याची तीन तिकीट काढली. परळीच्या गाडीत बसून शिवा
पडवळ पुढे दबा धरून बसलेल्या आपल्या
माणसाला गाडीतून बॅटरी दाखवून इशारा करणार होता.
इकडे बळवंतराव घोगरे, निवृत्ती देशमुख, जगन्नाथ
मांग, साहेबराव लामकाने, मल्हारी पडवळ, गेना केरू माळी, पुंडलिक घोगरे, बाबू काळे,
विठू बळी निंबाळकर,आटब्या एकनाथ मांग,नागा
नरसू वडर, वजीर कोंडोजी उस्मान,
नागाआप्पा पडवळ ही मंडळी विमानतळाच्या खालच्या बाजूला खोंगाळीत दबा धरून बसली
होती. जीवावर उदार होऊन ही मंडळी आता मोठे काहीतरी करणार होती. या हल्ल्याची तारीख
होती 14 सफल 1357 फसली, म्हणजे 14 फेब्रुवारी 1947 ची
ती अंधारी रात्र.
निजाम ट्रान्सपोर्टची बस क्रमांक 87 येडशी बसस्थानकावरून उस्मानाबादच्या दिशेने बस निघाली. बसचा
ड्रायव्हर महमद हसन घराच्या ओढीने आपली बस दामटीत होता. तर कंडक्टर उस्मान
सिद्दिकी आपला हिशोब पूर्ण करून कुणाला कुठे उतरायचे आहे याची चर्चा करत होता. उपळ्याच्या लोकांनी आपण कुठे
उतरायचय हे अगोदर ठरविलेले
होते. रस्ता कापत कापत बस गडपाटीवरून पुढे आली... तसा शिवा पडवळ खिडकीतून
बॅटरी दाखवायला लागला. झालं !! इशारा झाला, तसी पुढे बसलेली मंडळी सावध झाली. तशी धडा sss धड रस्त्यात दगडे पडायली लागली.
बस उपळ्याच्या शिवारात आली तसं
महमदने कचकण ब्रेक दाबले. रस्त्यावरची दगडं पाहून तो जोरात ओरडला, ये पत्थर किसने डाले है | दोन मिनिटात हसनला त्याचे उत्तर मिळाले. कारण तेवढ्यात भारत माता की जय sss
म्हणत काही मंडळी बसच्यासमोर आली. बस थांबताच दरवाजा उघडत शिवा पडवळ
खाली उतरायला लागला. तेवढ्यात धाड sss असा आवाज आला. निवृती
देशमुखांनी आपल्या बंदुकीतून एक बार सोडला होता. शिवा पडवळ मोठयाने ओरडला sss
कारण एक गोळी त्याच्या कानाला चाटून गेली होती. शिवा थोडक्यात
वाचला. निजाममात्र आता वाचणार नव्हता. देसाईनी आणखी एक बार भरला आणि मागचा टायर
फोडून टाकला.
बसमध्ये एकच गोंधळ उडाला, तर बाहेर घोषणा सुरू झाल्या भारत माता की
जय sss. आपले काम फत्ते झाल्याचा आनंद आता सर्वांच्या चेहर्यावर
होता. पाहता पाहता सारी मंडळी अंधारात पसार झाली. गाडीत पोलीस होता परंतु विरोध करण्याचे त्याने धाडस
झाले नाही. ड्रायव्हरला आता कल्पना आली होती
की, आपल्यावर हल्ला झालेला आहे. त्यांनी दगडे
बाजूला सारली आणि तशीच बस दामटत उस्मानाबाद पोलीस स्टेशनला आणली... पोलिसांनी पंचनामा केला. त्यात साक्षीदार म्हणून उमाशंकर
विश्वनाथ बिराजदार वय 39 जात लिंगायत नायब तहसीलदार कळंब, सालेम बिन
मोहम्मद, वय30, शिक्षक माणकेश्वर, मिर्झा आरीबेग
मेहबूब वय 22, करोडगिरी नाका, राहणार कौर यांचा समावेश होता.
पंचांनी दिलेल्या
जबाबानुसार उस्मानाबादच्या पोलीस ठाण्याच्या दप्तरी केस क्रमांक 32/ 2, 1357 फसलीनुसार परळी उस्मानाबाद बस उपळ्याच्या शिवारात
अज्ञातांनी आडवून लुटल्याची तक्रार नोंद करण्यात आली. खरतर बसमधील
सर्वच प्रवासी हे उस्मानाबादला
राहणारे होते, कुणीतरी आरोपींना
ओळखले असणार परंतु कुणीच त्यांची
नावे सांगितले नाहीत. उपळे निजाम राजवटीत मोडत
असल्यामुळे तसं कुणावर संशय येत नव्हता. येवढे मोठे धाडस केले आणि ते पचल्याने सर्वजण जाम खुश होते. गावात
बळवंतराव आणि इतरांच्या कौतुकाची चर्चा सुरू झाली, आणि पाहता पाहता उपळेकरांच्या मनात स्वातंत्र्याची नवी उर्मी
तयार झाली.
असेच एकेदिवशी राजाराम आणि शिवा
पडवळसह काहीजण कुस्त्या खेळण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील मसल्याला निघाली. त्यासाठी
उस्मानाबादला येण्यासाठी ही मंडळी निघाली. उपळ्याहून उस्मानाबादला येण्यासाठी
त्यावेळी तेल्याच्या चौकातून ओढा पार करून उजनकराच्या शेतातून आजच्या उस्मानाबाद MIDC च्या बाजूला चिरक्या माळावरून
आंबाबाईच्या मंदिराजवळून जेलच्या बाजूने पोलिस लाईनमध्ये निघायचा.
अगोदरच उशीर झाला होता, राजाराम पडवळसह
सर्वजण बसमध्ये चढले. निजामाची बस अडविल्याचा
जोश मनामध्ये कायम होता. जागा धरण्यावरून राजारामाचं काहीतरी बिनसलं,आणि शेजर्याला तो शिव्या द्यायला लागला. राजाराम
पडवळाने त्याच्या कानफटात लगावत वाक्य उच्चारले, निजामाची
बस फोडलीय तुझी काय कथा.. खाली उभ्या असलेल्या पोलिसाने हे वाक्य ऐकले आणि करंट बसावा तसा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, सरकारची बस फोडणारा आरोपी सापडला म्हणून तो जाम
खुश झाला..
राजारामाला
अटक प्रथम त्याने पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि मार
मार मारले.. तसं त्यांने आठवल
त्याची नावे घ्यायला सुरुवात केली.. चार
दिवस चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी 18 लोकांची नावे निश्चित केली.. निजाम पोलिसांच्या दप्तरी केस क्रमांक
32/2, 1357 फसली नुसार
नोंद झाली. उपळे इंग्रज राजवटीत
असल्यामुळे इतरांना पकडणे सोपे नव्हते, मात्र राजाराम पडवलाचे तुरुंगात हाल झाले.. तर असेच एकेदिवशी शिवा पडवळ आळणीच्या करोडगिरी
नाक्यावर पकडला गेला..
एक पडवळ पोलीस स्टेशनमध्ये तर एक पडवळ करोडगिरी नाक्यावर...
खरतर उपळ्यातील पडवळ आणि घोगरेमंडळी मुळची पश्चिम महाराष्ट्रातील. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी यांचे पूर्वज
कधी काळी लढलेले होते... हिम्मत करून राजाराम आणि शिवा दोघांनी आपापल्या ठिकाणाहून स्वतःची
सुटका करून घेतली.. आपल्या राज्यात आपल्यावर हल्ला झाला
ही गोष्ट निजामाच्या दप्तरी नोंद झाली.. साहाजिकच आहे कलेक्टरच्या मनात उपळेकराविषयी भयंकर चीड निर्माण झाली. .. त्यातूनच
पुढे उपळेकरावर महा भयानक संकट कोसळले.
प्रा. डॉ. सतीश कदम, 9422650044
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.