जागतिक वारसा दिन विशेष
२००० वर्षांपुर्वीच्या २५०० वर वस्तूचा संग्रह करणारे तेरचे लामतुरे घराणे
तेर किंवा तगर म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचे जगातील नामांकित असे व्यापारी केंद्र असून इथल्या वस्तूला युरोप खंडातून मोठी मागणी होती. इ.स. च्या दुसऱ्या शतकात दक्षिण भारतातील नावाजलेल्या सातवाहन घराण्याची पैठण ही राजधानी असून त्यांचा व्यापार हा पैठण ( प्रतिष्टान ) जुन्नर ( जीर्णनगर ) तेर ( तगर ) नेवासे आणि नाशिक या मुख्य शहरात चालत होता. यातही विशेष म्हणजे तगरमधील सुती कापड, शंखाच्या बांगडया, मातीची उच्च प्रतीची भांडी व इतर वस्तूला जगात मोठी मागणी होती.
याचसोबत जैन, बौद्ध आणि शैव वैष्णव पंथ यांचाही येथे मोठा वावर होता. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वी तेर हे अतिशय प्रसिद्ध पावलेले शहर होते. एवढेच कायतर युरोपीय लोकांची तेरमध्ये स्वतंत्र कॉलोनी होती. तेरणा नदीकाठी वसलेल्या तेर गावचे दुसरे वैशिष्ठ म्हणजे हे गाव जवळपास चार वेळा विविध कारणांनी उध्वस्त झाले आणि त्यानंतर नवीन वस्ती तयार होत गेल्या. अशा या विचित्र उलथापालथीमुळे तेरच्या गर्भात एक मोठा ऐतिहासिक ठेवा दडला गेला. दुर्भाग्याने तेराव्या शतकापासून स्वातंत्र्यापर्यंत सलग ६५० वर्षे यापरिसरावर मुस्लिम शासकांचे साम्राज्य राहिलेले आहे. त्यामुळे बाराव्या शतकात संत गोरोबाकाकामुळे पुनर्जिवीत झालेले तेर गाव पुन्हा चर्चेतून बाहेर गेले.
श्री रामलिंगाप्पा खंडाप्पा लामतुरे पुन्हा चर्चेत --
रामलिंगअप्पा हे साधे गुराखी व हमाली करणारे व्यक्ती पुढे व्यापार उद्योगात गेले आणि पाहता पाहता १७५ एकराचे मालक आणि नामांकित व्यापारी म्हणून तेर परिसरात नावारूपाला आले. व्यापारामुळे त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. असेच एकदा लातूरच्या राजस्थान मारवाडी विद्यालयाचे चॅटर्जी नावाचे एक शिक्षक एका युरोपियन माणसाला घेऊन तेरला आले. रेणुकाई टेकडीवर फिरत असताना त्यांना जागोजागी खापरे दिसायला लागली. गावकर्यांना हे नवीन नव्हत, गोऱ्या कुंभाराची कृपा म्हणत याकडे कोणी फारसे लक्ष देत नसायचे. मात्र तो युरिपियन खापरं घेऊन खाली बसला आणि आपल्या रुमालाने तो पुसायला लागला. त्यातून त्याने सांगितले हा जागतिक ठेवा दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. अशा वस्तू जमा केल्या पाहिजेत. तेरचे वैशिष्ट म्हणजे गावात कुठेही खोदायला लागले कि काहीतरी सापडतेच. त्या युरोपियन माणसामुळे रामलिंगअप्पाला वस्तू जमा करण्याचा छंद लागला.
तो लागला म्हणजे साधा नाही तर आपल्या शेतातील मजूर वगैरे घेऊन ते गावभर फिरायला लागले. पुढे पुढेतर लोक भंगार गोळा करतात तसे यांनी लोकांना वस्तू आणल्यानंतर पैसे द्यायला सुरुवात केली. तीस पस्तीस वर्षात त्यांच्याकडे तब्बल २७, ८९८ विविध ऐतेहासिक वस्तूंचा संग्रह झाला.
डेक्कन कॉलेज ने प्रथम दखल घेतली
प्राचीन कालखंडातील टॉल्मी असेल किंवा इंग्रज काळातील भारतीय पुरातत्व खात्याचे प्रमुख हेन्री कझिन्स यांनी तेरबाबत चांगली नोंद करून ठेवलेली आहे. १९५० च्या आसपास यावर लेख छापून आल्यानंतर पुरातत्व विभागावर अग्रक्रमाणे काम करण्याऱ्या डेक्कन कॉलेजच्या अभ्यासकांनी तेरला आवर्जून भेट देऊन याची प्रसिद्धी केली आणि तेर पुन्हा चर्चेला आले. दरम्यान तेरच्या लामतुरे नामक एका व्यक्तीकडे हजारो वस्तूंचा ठेवा आहे हि खबर कानोकानी अभ्यासकांकडे पसरायला लागली. याचवेळी आणखी एक घटना घडली ती म्हणजे मा. मुरारजी देसाई यांच्या कन्या एका कार्यक्रमासाठी तेरला आल्या असता त्यांच्यासोबत डग्लस ब्यारेट नावाचा एक इंग्लडचा अभ्यासू माणूस आला होता. जाणकार माणसं आली कि, त्यांना आप्पाच्या घरी नेवून त्यांचा संग्रह दाखवायचा हे आता नित्याचेच झाले असल्याने ज्यावेळी डग्लससाहेब या वस्तू पाहायला लागले तेव्हा त्यांचे डोळे विस्फरायला लागले.
कारण अप्पांच्या खजिनात खापरे, नाणी, विविध कलाकुसरीच्या वास्तूसोबत ५ विविध प्रकारच्या बाहुल्या होत्या. त्यात हस्तिदंताची तगर लक्ष्मी, एक संन्यासिनी, आफ्रिकन मुखवटा असणारी बाहुली, राजदंड घेऊन उभा असलेली बाहुली आणि हाडापासून बनविलेली बाहुली यांचा समावेश आहे. तुम्ही म्हणाल यात विशेष काय ? पहिल्याच बोलीत डग्लस नावाच्या रत्नपारख्याने बोली लावली तब्बल ११ लाख रुपये. अप्पा हे हौशी व्यक्ती. त्यांनी सांगितले कोटी रुपये दिलेतरी हि बाहुली तेर सोडणार नाही. २००० वर्षांपूर्वीची हि तेरची लक्ष्मी आहे. याचवेळी आप्पांना समजून चुकले कि जग आपणाला वेडे म्हणत असतानाही आपण जे सोने माणिकमोतीरुपी भंगार जमा केले ते आज करोडोत आहे, पण त्याचवेळी त्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधली कि, याचा वापर कुठल्याही कारणास्तव अर्थार्जनासाठी करायचा नाही.
देवीसिंग चौहान ते शिवाजीराव पाटील बाभळगावकर पर्यंत --
हैद्राबाद आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक अभ्यासू मंत्री आणि इतिहासाची मोठी जाण असणाऱ्या देविसिंगानी तेरला भेट देऊन यासाठी एखादे संग्रहालय काढण्यासाठी मा. मधुकरराव चौधरी, मा. यशवंतराव चव्हाण यांना आप्पाच्या कार्याची दखल घ्यायला लावली. दरम्यान मा. शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांनी यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून सरकारचे लक्ष वेधले.
तेरचे रामलिंगआप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालय म्हणजे एका ध्येयवेड्या संग्राहकाला वाहिलेली श्रद्धांजली --
आप्पानंतर त्यांचे चिरंजीव भगवंताप्पा आणि नातू मा. रेवणसिद्ध लामतुरेआण्णा यांनीपण हा वसा पुढे चालविला आहे. आज अण्णांच्या ठेव्यात या खास बाहुल्या पाहिल्यानंतर आपणास दोन हजार वर्षाचा इतिहास कल्पनेने अनुभवता येतो. शेवटी गावची कूस काय असते? हे त्यांनी दाखवून दिले. एवढे मोठे संग्रहालय तेही अगदी छोटयाशा गावात असणे म्हणजे लामतुरे कुटुंबाने केलेल्या इतिहासाच्या सेवेचे फळ आहे. ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वस्तू संग्रहालयालाही जवळपास ५०० वस्तू २५ वर्षांसाठी देऊन टाकल्याने तेथे बसूनच लोकांना तेरचे वैभव नजरेत साठवता येते.
लामतुरे कुटुंबाने ऐतिहासिक वारसा जपावा म्हणून दिलेले योगदान दिशादर्शक असून आजच्यादिवशी मा. आप्पांना या लेखातून श्रदांजली अर्पण करतो.
डॉ. सतीश कदम ९४२२६५००४४
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.