ऐसा राजा होणे नाही ----
शिवरायांच्या निधनाविषयी ९१ कलमी बखरीतील वर्णन याप्रमाणे आहे- " मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची जाहली, आयुष्याच्या मर्यादा जाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते. " त्यानुसार यावेळी रायगडावर सोयराबाई, पुतळाबाई, रामराजे या घरातील मंडळींसह सर्व आठ मंत्री व काही मुत्सद्दी उपस्थित होते. १. हिरोजी फर्जंद २. बाबाजी घाटगे ३. बाजी कदम ४. मुधोजी सरकवास५. सूर्याजी मालुसरा आणि ६. महादजी नाईक पानसंबळ
राजांनी आपल्या जिवाभावाच्या मंडळींची अखेरची भेट घेतली. विकलांग झालेल्या महाराजांचे दर्शन घडताच सर्वांचे कंठ दाटून आले. डोळे अश्रूंनी डबडबून गेले. क्षीण आवाजात महाराजांनी त्यांना समजावले, ' तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यू लोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा . आपण श्रीचे स्मरण करतो.' अखेर महाराजांची शुद्ध हरपली व दोन प्रहरी म्हणजे सुमारे १२ वाजता " श्रीनृपशालिवाहन शके १६०२ रौद्र नाम सवंत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा ( हनुमान जयंती ) वार शनिवार दिनांक ३ एप्रिल १६८० रोजी हा श्रीमंत योगी रायगडावर अकस्मात अस्तंगत झाला. !!!!
महाराजांची शिबिका सजली. शास्रानुसार त्यांच्या कलेवराला सर्व राजचिन्हे परिधान केली. धर्मशास्रानुसार सर्व उपचार आटोपले ... आणि अश्रू ढाळणाऱ्या, राजांना जीव की प्राण असणाऱ्या, रायगडावरील प्रजाजनांच्या उपस्थितीत महाराजांची अखेरची मिरवणूक निघाली. सूर्य माथ्यावरून ढळला होता. राजस्रिया, रामराजे, महाराजांचे कारभारी व अवघे प्रजाजन शोक विव्हल हा विचित्र सोहळा पाहत होते, अनुभवत होते.
राजसिंहासनाला दक्षिणेकडून वळसा घालून बाजारपेठेतून जगदीश्वराच्या प्रासादाकडे निघाली. या राजमार्गाने महाराजांना अनेकदा जवळून पहिले होते ! यापूर्वीही महाराजांची प्रचंड मिरवणूक त्याने डोळे भरून पहिली होती, राज्याभिषेकाच्यावेळी ! आज हि अखेरची मिरवणूक !! जगदीश्वराच्या प्रसादासमोर बेलकाष्ठे व चंदनकाष्ठे यांची चिता रचून रामराजांच्याहस्ते महाराजांच्या कलेवराला मंत्राग्नी देण्यात आला. साबाजी भोसले यांनी उत्तरक्रिया पार पाडली ......
प्रसंगाचे सभासदाने केलेले वर्णन मोठे हृदयद्रावक आहे, " ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशातून जाला. रात्री जोड इंद्रधनुष्ये निघाली. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेव तळ्याचे उदक रक्तमय जाले. पाण्यातील मस्त्य बाहेर पडून अमासवानी उदक जाहाले. "
अशा असामान्य महापुरुषाविषयी महाभारतातील एक मार्मिक सिद्धांत लागू पडतो.....
" तिले तैलं गवि क्षीरं काष्ठे पावकंन्तत :
एवं धीरो विजानियाद उपायं चाSस्य सिद्धये I"
Dr. satish kadam 9422650044
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.