कुर्डूवाडी
गावाच्या नावाचा इतिहास
आज
रेल्वेमुळे सर्वांना परिचित असणार्या कुर्डूवाडी गावाचा इतिहास फार मनोरंजक असून
शंभर वर्षाचा इतिहास उलगडून पहिलातर केवळ रेल्वेमुळे निर्माण झालेले गाव
म्हणूनसुद्धा याच्याकडे पाहता येईल. मुंबई- बेंगलोर, कोल्हापूर- नागपूर अशा मोठ्या महामार्गावरील एक महत्वाचे जंक्शन म्हणून
कुर्डूवाडीला महत्वाचे स्थान असलेतरी गावाचा इतिहास शंभर वर्षापलीकडे जात नाही.
मुळातच या गावाची आणि नावाची निर्मिती ही केवळ रेल्वेमुळे झालेली असल्याने
रेल्वेचा इतिहासही मोठा मनोरंजक असल्याचे मत इतिहास संशोधक प्रा.डॉ. सतीश कदम
यांनी व्यक्त केले आहे.
प्रा.
कदम हे महाराष्ट्र इतिहास परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून त्यांनी कधीकाळी देवाची
गाडी म्हणून ओळखल्या जाणार्या बार्सी लाईट रेल्वेच्या इतिहासावर संशोधन करत
असताना अनेक नवीन बाबी पुढे आणल्या आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतातील पहिली
रेल्वे 16 एप्रिल 1853 ला मुंबई
ते ठाणे या दरम्यान धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी स्थापन
करण्यात आली. त्यानंतर हळूहळू तिचा सर्वत्र प्रसार सुरू झाला. त्यानुसार मुंबईवरुन
सोलापूरकडे जाणार्या रेल्वेचा प्रवास सुरू झाला. त्यातूनच 1859 साली पुणे ते
बार्सी रोड ही रेल्वे सुरू झाली. याच बार्सी रोड नावात कुर्डूवाडीचा इतिहास दडलेला
आहे. सोलापूरकडे रेल्वे नेताना इंग्रचांचे लक्ष बार्शी या गावावर होते. कारण
त्याकाळी बार्शी हे मोठे व्यापारी केंद्र असून तेथे कपडा आणि ऑइल मिलही होत्या.
त्यामुळे बार्शीकरिता इंग्रजांनी कुर्डू गावाजवळ एक स्वतंत्र थांबा
देऊन त्याला बार्शी रोड हे नाव दिले. त्याच्या बाजूला काही गोसाव्याची घरे
असल्याने त्याला गोसाव्याची वाडी म्हटले जायचे. रेल्वेच्या कागदोपत्री मात्र याला
बार्शी रोड हेच नाव होते.
पुढे
1860 ला ही रेल्वे सोलापूरपर्यन्त गेली. इकडे बार्शीचा व्यापार वाढल्याने बार्शी
रोडची गर्दी वाढायला लागली. त्यामुळे एव्हरार्ड काल्थरॉप नावाच्या इंजिनीअरने
भारतीय रेल्वेचा राजीनामा देऊन बार्शी रोड ते बार्शी हा 34
किमीचा नवीन रेल्वेमार्ग काढण्यासाठी ‘ बार्सी
लाइट रेल्वे’ नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन करून 1 मार्च
1897 ला ती रेल्वे सुरू केली.तिचा विस्तार पुढे लातूरपर्यंत झाला तर 1927 ला तिकडे
मिरजपर्यन्त बार्सी लाइट रेल्वे वाढली. बार्सी लाईट रेल्वे ही एक स्वतंत्र कंपनी
असून मुंबई किंवा बेंगलोरकडे सहज जाते यावे म्हणून इंग्रजांनी कंपनीचे मुख्यालय हे
बार्सी रोड याठिकाणी ठेवले. बार्शीच्या व्यापारामुळे हळूहळू करून या बार्सी रोडला
महत्व यायला लागले. थोड्या अंतरावर असणार्या गोसाव्याच्या वस्तीमुळे तेथे हळूहळू
वस्तीही वाढायला लागली.
वाढलेल्या
वस्तीला लोक कुर्डूवाडी म्हणायला लागले, तरीपण इंग्रजांच्या कागदोपत्री याचे नाव बार्सी रोड हेच होते. याचवेळी
बार्शीचे स्पेलिंग barsee असे लिहिले जायचे. त्यात बदल करून 1870 साली ते barsi याप्रमाणे लिहिण्याचे आदेश काढण्यात आले. इंग्रजांनी बार्शी हा शब्द
शेवटपर्यन्त बारसी ( barsi ) असाच लिहिला. तर पुढे बार्सी
रोडला वाढलेली गर्दी पाहून रेल्वे विभागाने 23 आक्टोंबर 1914 ला नोटिफिकेशन काढून
बार्सी लाईट रेल्वे अंतर्गत येणार्या बार्सी रोडचे नामांतर कुर्डूवाडी असे केले.
पुढे 1930 ला कुर्डूवाडी येथे बार्सी लाईट रेल्वेचा वर्कशॉप निघाला. तर 1920
इंग्रजांनी शाळा सुरू केल्या. 1922 पासून इंग्रज अधिकार्यांना
राहण्यासाठी मोठ्या वसाहती बांधल्या जाऊ लागल्या. तर चिंक ( माकड) हिल याठिकाणी
रेल्वे पोलिसांचे ट्रेनिंग सेंटर सुरू झाले. अशारितीने कुर्डूवाडीची स्थापना आणि
विस्तार ही रेल्वेची देन आहे असे म्हटल्यावर वावगे ठरू नये. तर कदम यांनी अस्सल कागदपत्राच्या आधारे केलेल्या
संशोधनामुळे कुर्डूवाडीच्या इतिहासाला उजळा मिळाला आहे.
महत्वाचे – 1. बार्सी लाईट रेल्वे ही स्वतंत्र
कंपनी असून तिचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नव्हता. 1897 ला एव्हरार्ड काल्थरॉप
नावाच्या इंग्रजाने सुरू केलेली ही कंपनी पुढे 1953 पर्यन्त चालली. मीरज ते लातूर
असा 325 किमीवर धावणार्या बार्सी लाईट रेल्वेचे मुख्यालय हे बार्शी रोड म्हणजे
आजच्या कुर्डूवाडीत ता. माढा,
जिल्हा सोलापूर याचठिकाणी होते.
2.
इंग्रजांच्या कागदोपत्री कुर्डूवाडीचे नाव हे बार्सी रोड हेच होते. केवळ रेल्वे
जंक्शनमुळेच कुर्डूवाडी गावाची निर्मिती झालेली आहे. 23 आक्टोंबर 1914 ला
इंग्रजांनी स्वतंत्र परिपत्रक काढून बार्शी रोडचे नामांतर कुर्डूवाडी केले आहे.
3.
बार्सी लाईट रेल्वेसाठी प्रवासाचे दर प्रथम वर्ग – 24 पैसे प्रती मैल, द्वितीय – 12 पैसे, तृतीय – 8 पैसे आणि चतुर्थ
वर्ग- 3 पैशाला प्रती मैल म्हणजे मीरज ते पंढपूरचे तिकीट होते फक्त 1 रुपया 12
पैसे 3 आणे एवढे होते. मालाला 4 पैशाला मन होता. तर घोड्याला 24 पैसे तर
कुत्र्याला 8 आणे प्रती मैल वाहतुकीचा दर होता.
प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044
0 टिप्पण्या
pls tell me what your mind.